Link copied!
Sign in / Sign up
116
Shares

तुम्ही तुमच्या बाळांना बिघडवत आहात का?


या जगात कोणीच परफेक्ट नाही. खास करून जेंव्हा मुलांना वाढवण्याची वेळ येते तेंव्हा पालकांसाठी हे एक दिव्य असे काम असते. पालकत्वाच्या बाबतीत असणाऱ्या सगळ्याच अपेक्षा सगळे पूर्ण करू शकतात असे नाही. अनेकजण वेगवेगळे सल्ले देत असतात आणि त्यामुळे आपण करतोय त्यातले बरोबर काय आणि चुकीचे काय हे ठरवण्यात त्यांचा गोंधळ उडतो. जर तुमच्या मुलांना तुम्ही बिघडवत तर नाही ना? असा प्रश्न पडला असेल तर आम्ही अशा काही लक्षणांची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातल्या काही गोष्टी तुमच्या वागण्याशी जुळत असतील तर आधीच सतर्क व्हा.

१) वस्तू घेऊन देणे

तुम्ही तुमच्या पाल्याला नेहेमी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन देत असता का ? त्याच्या वयाप्रमाणे त्याला काही खेळणी घेऊन देणे योग्य आहे परंतु नेहेमी अशा वस्तू आणि गिफ्ट्स घेऊन देण्याने त्याच्यामध्ये भौतिक वस्तूंविषयी सुख वाढते. नंतर नंतर अशी सवय पडल्यामुळे हवी ती वस्तू न मिळाल्यास हट्टीपणा करणे, चिडचिड करणे अशा गोष्टी मुलांकडून घडू लागतात. हवे ते लगेच मिळवून देण्याची सवय तुमच्या मुलांना असेल तर तुम्ही त्यांना बिघडवत आहात.

२) हट्ट पुरवणे

जेंव्हा जेंव्हा कोणत्या गोष्टीची तुमच्या मुलांकडून मागणी होते तेंव्हा तुम्ही ती लगेच पूर्ण करता का? जर असे असेल तर तुमची तुमच्या मुलांना बिघडवण्याच्या मार्गावर पाठवत आहात. मुलांना त्यांच्या वाढत्या वयानुसार जसे कळायला लागते तसे त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून ते शिकत जातात. त्यांना हवी असलेली किंवा त्यांना आवडलेली गोष्ट तुम्ही त्यांना लगेच घेऊन दिलीत तर या जगा संबंधीच्या त्यांच्या चुकीच्या संकल्पना बनत जातील. मेहेनत, संघर्ष आणि संयम अशा गोष्टी त्यांना ज्या वयात कळायला हव्या ते वय निघून जाऊ देऊ नका. त्यांना भविष्यात अनेक गोष्टींसाठी धडपड करावी लागेलच. त्यांना आत्ता सर्व सहज मिळाले तर त्यांच्या मनात चुकीची समजूत बसेल.

३) आमिष दाखवणे

मुलांना अभ्यासाला बसवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून एखादी कृती करून घेण्यासाठी तुम्ही त्यांना काही भेटवस्तूंचे आमिष दाखवता का ? कधी कधी पालक मुलांनी अभ्यास करावा किंवा एखादे काम पूर्ण करावे यासाठी त्यांना नवीन वस्तू , खेळणी, व्हिडियो गेम घेऊन देण्याचे आमिष दाखवतात. तुम्हीपण असेच करत असाल तर कदाचित हे तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी चुकीचे आहे. कारण यामुळे काही काम केल्यास त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे अशी चुकीची समजुत मुलांच्या मनात बसते. त्यामुळे नंतर ते हट्टी बनतात.

४) त्यांची लढाई त्यांना लढू द्या

लहान मुले अनेकदा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत भांडतात. अनेकदा शाळेत शिक्षकही त्यांना रागावतात. अशावेळी त्यांचे मानसिक स्थैर्य कायम नसते. मुले दुखी होतात, चिडतात, रडतात. अशा बाबतीत मुलांना आधार देणे तुमचे काम आहेच. परंतु नेहेमी भांडणात तुमच्याच मुलांची बाजू घेणे, शिक्षकांसमोर मुलांना पाठीशी घालणे, त्यांच्या चुका माफ करणे अशामुळे मुले बिघडू शकतात. मुलांना त्यांची लढाई स्वतः लढू द्या. आयुष्यात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यायचे आहे. दरवेळी तुम्ही त्यांना पाठीशी घालणे योग्य नाही. अशा मुलांना नंतर थोडासा मानसिक त्रास सुद्धा सहन होत नाही. त्यामुळे तुमच्या मुलांना भाविष्यात होणाऱ्या गोष्टींना तोंड द्यायला शिकवा.

५) हट्टीपणा

मुले हट्टीपणा करतातच. बाजारात गेल्यावर एखादी गोष्ट आवडली कि मुले मागे लागतात. नखरे करतात. तुम्ही त्यांच्या रडण्याला किंवा हत्तीपानाला भुलून त्यांना दरवेळी हवी ती गोष्ट घेऊन दिलीत तर त्यांचा विश्वास बसेल कि नखरे केल्याने, रडल्याने हवी ती गोष्ट मिळवता येते. त्यांना या समजुतीपासून दूर न्या. त्यांचे हट्ट दरवेळी पुरवले जाणार नाहीत असे त्यांना बजावून सांगा. त्यांच्या रडारड करण्याला किंवा हट्ट करण्याला भुलून जाऊन त्यांना दरवेळी होकार देऊ नका. कारण अशाने मुले बिघडतात आणि वस्तूस्थितीचे भान त्यांना लवकर येत नाही.

६) परिणाम

तुमच्या मुलांना या गोष्टीची जाणीव होऊ द्या की त्यांच्या वागणूकीचे परिणाम होणार आहेत. त्यांच्या गुणी वागण्याचे कौतुक करा तसेच त्यांच्या चुकीच्या वागण्याची त्यांना शिक्षा देखील करा. त्यांच्या चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करणे किंवा दरवेळी कानाडोळा करून त्याची दखल न घेण्याने मुले बिघडतात. त्यांच्या मनात भीती किंवा धाक बसत नाही. चूकीचे वागूनही काहीही परिणाम होणार नाही असे त्यांना वाटेल आणि ते कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करणार नाहीत.

७) अनादर

तुमचे पाल्य अनेकदा तुमच्याशी किंवा आजूबाजूच्या माणसांशी उद्धटपणे बोलते का? मोठ्यांचा अनादर करण्याची वृत्ती मुलांना सवयीने लागते. त्यांच्या मनात धाक नसेल किंवा त्यांच्या अशा बोलण्याने काहीही परिणाम होणार नाही अशी त्यांची समजूत बसलेली असते तेंव्हा मुले असे वागतात. त्यांच्या अशा अनादर करण्याच्या वृत्तीकडे तुम्ही दुर्लक्ष केल्याने त्यांना अशी सवय लागते. मग मुलांची बाहेरच्या जगात ‘उद्धट’ प्रतिमा बनते. शाळेत शिक्षकांशी उद्धटपणे बोलणे, वर्गमित्रांना त्रास देणे, आगाऊपणा करणे अशा गोष्टी मुले मग वारंवार करू लागतात. तुमचे पाल्य तुमच्याशी मोठ्याने चिडून बोलत असेल तर हेच त्याचे मोठ्यांचा अनादर करण्याचे लक्षण आहे.

जेंव्हा पालकत्व निभावण्याची वेळ येते तेंव्हा मानसशास्त्रात याविषयी ४ पद्धती सांगितल्या आहेत. वरीलपैकी दिलेली लक्षणे तुमच्यात एक पालक म्हणून दिसत असतील तर तुम्ही इंडल्जंट किंवा पॅसिव्ह पालक आहात आणि जर वरील लक्षणे आणि त्याचे परिणाम तुमच्या मुलांमध्ये दिसत असतील तर तुम्ही तुमच्या पालकत्वाच्या पद्धतींचा पुन्हा विचार करणे गरजेचे आहे. तेंव्हा सतर्क व्हा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon