Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

तुमचे वैवाहिक जीवन नकोसे झाले आहे का ?

लग्न एका व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे दिवस घेऊन येतं. लग्नानंतर एकमेकांसोबत नाते शेअर करायचे आणि सुख- दुःखात सामील व्हायचे असा असा अलिखित नियम असतो. लग्नानंतर अनेक जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात, आरोग्य सुधारते, मन आनंदी राहते तर काहीजणांना यातून नैराश्य येते, त्यांचे नाते त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी नकारात्मक बनत जाते. परंतु खेद असा, की काही जणांना हा बदल लक्षात येत नाही. जे चालले आहे ते योग्य आहे असे त्यांना वाटत राहते. तुमचे लग्न सुद्धा याच मार्गावर आहे का? तुमच्या नात्यातून तुम्हाला जीवनातली सकारात्मकता मिळते आहे का ? आम्ही इथे यासाठी काही लक्षणे मांडली आहेत. तुम्हाला तुमच्या नात्यासाठी काही ठोस पाऊले उचलायची गरज आहे का हे यातून नक्की तपासून पहा.

१. तुम्ही दोघे नेहेमी एकमेकांच्या वागणुकीत चुका काढत असता.

तुमचा साथीदार तुम्ही केलेल्या कोणत्याही गोष्टीत किंवा तुमच्या वागणुकीत चुका काढतो का? तुमच्या दोघात तोंडी वाद होतात का? तुम्ही वापरलेले शब्द तुमच्याच विरोधात वापरले जातात किंवा एकमेकांच्या बोलण्यामागे नेहेमीच उद्देश शोधण्याचा हेतू तुमचा असतो का? जर असे असेल तर ही एक संकटाची निशाणी आहे. एकमेकांच्या चुका दाखवून देणे ठीक आहे परंतु याचे रुपांतर भांडणात होत असेल तर मात्र याकडे जरा लक्ष द्या.

२. तुम्ही या नात्याचे सत्य इतरांपासून लपवता.

काही गोष्टी या घरातल्या घरात चार भिंतीत राहायला हव्या. लग्नानंतर पती-पत्नीचे जीवन अत्यंत खाजगी असते. परंतु जेंव्हा आपले मित्र-मैत्रिणी भेटतात, माहेरचे किंवा इतर जवळचे नातेवाईक भेटतात तेंव्हा तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल तुम्ही ‘सर्व काही सुखात आहे’ असे दाखवता. त्या सत्याला सामोरे जाण्याची तुमची इच्छा नसते. तुमच्या दोघांमधील दुरावा स्पष्ट असतांना तुम्ही हे सत्य इतरांपासून लपवता तेंव्हा या नात्याची दिशा तुम्ही वेळीच ओळखायला हवी.

३. तुम्ही दुखी आहात आणि नेहेमीपेक्षा तुम्हाला जास्त रडू येते.

 

तुम्ही दिवसभर गुमसुम राहता का? तुमच्यात उत्साह राहत नाही आणि कामात थोडा जरी अडथळा आला तरी तुमचा धीर सुटतो आणि चिडचिड होऊन तुम्ही रडू लागता किंवा कामात मन लागत नाही का? अनेकदा सर्वात जवळचे नाते योग्य रीतीने चालले नसेल तर व्यक्तीचे मन इतर गोष्टीत लागत नाही. गाडी चालवतांना किंवा ऑफिसात कामात तुम्ही अब्सेंड माइंडने वागता किवा मनात दुसरेच विचार चालू असतात तेंव्हा असे घडते. रात्री अचानक उठून याविषयी विचार करत बसणे हे तुमच्या नात्यातील वाढत्या दुराव्याचे लक्षण आहे.

४. तुमच्या दोघांमध्ये मानसिक आणि शाररिक ओढ राहिली कमी झाली आहे का ?

सेक्स ही एक मुलभूत गरज आहे. प्रत्येकाला आपण कोणाशीतरी प्रेमाने जोडलेले असावे असे वाटतेच. प्रेमाची भूक सगळ्यांना असते. परतू तुमच्या नात्यातील हा उत्साह नाहीसा किंवा खूप कमी झाला असेल तर काहीतरी गडबड आहे. तुमच्या दोघांमध्ये काही मानसिक दुरावा असेल तर तो शारीरिक संबंधांमध्ये सुद्धा दिसून येतो. काही काळाने तुम्ही दोघे एकमेकांशी असणाऱ्या सामान्य स्पर्शाला देखील नाकारू लागता जसे, चुंबन घेणे, मिठी मारणे, हात पकडणे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी पुन्हा जुडण्याची इच्छा नाहीशी होते.

५. तुम्ही तुमच्या जोडीदाराला सोडून देण्याचा विचार वारंवार करता आहात.

दोघांमधील सगळे धागे तोडून टाकण्याचा विचार तुमच्या मनामध्ये वारंवार येतो आणि यात नाते संपल्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे तुम्ही मनामध्ये नेहमीच मांडत असता तर ही धोक्याची घंटा  आहे. तुमचे मन लग्न तोडल्यानंतर काय होईल याचा विचार करत असते. मनुष्याच्या स्वभावानुसार ‘फाईट ऑर फ्लाईट‘ असे दोन पर्याय तुमच्या समोर असतात. तुम्हाला या नात्यापासून होणाऱ्या त्रासातून पळून जावेसे वाटते. तुमच्या नात्याच्या स्थितीचा पुनर्विचार तुम्ही करायला हवा.

६. तुम्ही स्वतःला कुटुंब, मित्र-मंडळी आणि समाजापासून दूर केले आहे.

एकटे राहणे तुम्ही पसंत करता का? पूर्वीसारखे तुम्हाला पार्टीचे आमंत्रण आले की तुम्ही तिथे जायला नाकारता, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाणे तुम्ही टाळता, तुमच्या आई-वडिलांशी बोलतांना तुमचा त्रागा होतो आणि एकूणच एकांत तुम्हाला हवाहवासा वाटणे ही नैराश्याच्या दिशेने जाणारी पाऊले आहेत. तुम्हाला वाटते की कोणीच तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. तुमच्या भावना आणि मन दुसऱ्या कोणासोबत वाटून घ्यायला तुम्ही कचरत आहात तर हे तुमच्या लग्नाच्या नात्यातील आलेले अपयश आहे.

कोणतेही नाते परफेक्ट नसते. चर्चा आणि सामंजस्यातून मार्ग निघत असतो. तुमही स्वतःला वर दिलेल्या लक्षणांशी जोडू शकत असाल तर तुमच्या दोघांच्या नात्याची पडताळणी करून पहा. तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या साथीदाराच्या बाजूंचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा लागेल.  नात्यात समस्या निर्माण झाल्या असतील  तर त्याचा पुनर्विचार तुमच्याकडून होणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या जे योग्य आहे त्याची निवड कराल याची आम्हाला खात्री आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon