Link copied!
Sign in / Sign up
23
Shares

स्तनांचा कर्करोग, दुधाच्या गाठी-लक्षणे, कारणे उपाय


भारतात कर्करोगाने चांगलेच पाय पसरले आहेत. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर स्त्रियांमधील कर्करोगाच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. ०.७ दशलक्ष कर्करोगाचे स्त्री रुग्णांची नोंद झाली आहे तर प्रत्येक वर्षी १ ते १.४ दशलक्ष रुग्णांची नोंद होत नाही. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. एक लाख महिलांच्या मागे २५. ८ टक्के स्त्रियांना स्तनांचा कर्करोग होतो आणि १ लाख महिलांच्या मागे १२.७ महिलांचा मृत्यु होतो. थोडक्यात ९ पैकी एका स्त्रीला कर्करोग होत असल्याचे आढळून आले आहे.

स्तनाचा कर्करोग म्हणजे 

स्त्रियांमध्ये बहुतांश वेळा स्तनांचा कर्करोग झालेला दिसून येतो. रोगकारक, असामान्य पेशींची शरीरात वाढ होते. त्या निरोगी पेशींवर हल्ला करतात. स्तनांच्या कर्करोगाची सुरुवात स्तनांच्या पेशींपासून होते आणि हळूहळू तो इतर भागात पसरू लागतो. कर्करोगाची सुरुवात ही चरबीच्या पेशींमध्ये होते. या मांसपेशी स्तनांमध्येही आढळतात. अनावश्यक पेशींची वाढ होते आणि त्या नष्ट होण्याऐवजी तशाच राहातात आणि वृद्धींगत होतात. या पेशींच्या समुहाला गाठ म्हणतात. स्तनाच्या कर्करोगाची गाठ ही असामान्य असते. तिचा काही निश्चित आकार नसतो. सर्वसाधारणपणे प्राथमिक अवस्थेत ही गाठ वेदनादायी नसते. स्तनाच्या किंवा स्तनाग्रांच्या कोणत्याही भागात ही विकसित होऊ शकते. अर्थात स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळण्यास उशीर होतो.

लक्षणे

स्तन किंवा स्तनाग्रे यांच्या जवळ गाठ येणे ती न दुखणारी असते. ही सुरुवात असते. कालांतराने स्तन दुखतात आणि स्तनाग्रांमधून रक्तमिश्रित स्राव बाहेर पडू लागतो. अचानक स्तनांचा आकार वाढतो ते घट्ट होतात. स्तन आकुंचन पावतात. स्तनाग्रे आत खेचल्यासारखे होतात. ती लाल होऊन वेदना होतात. स्नायूंच्या वेदना, पाठदुखी आणि अशक्तपणाही वाटतो. स्तनांची त्वचा लाल होते तसेच कारणाव्यतिरिक्त स्तनांना इजा झाल्यास ती स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

कोणाला आहे धोका 

पंचवीसीनंतर कोणत्याही स्त्रीला स्तनांच्या कर्करोगाचा धोका असतो. ज्या स्त्रिया बाळाला स्तनपान करवतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

      कारणे

वयाच्या ३५ ते ५५ वर्षात स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. अनुवांशिकता हे देखील स्तनांच्या कर्करोगाचे एक कारण असू शकते. कुटुंबातील आई, बहिण यापैकी कोणाला स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. त्याशिवाय अतिस्थूलता, स्तनाचे वजन जास्त असण, आहारात तेल- तुपाचे प्रमाण अधिक असणे. संततीप्रतिबंधक गोळ्याचा दीर्घकालीन वापर, वंधत्व, स्तनपान न करणे. ह्या कारणांशिवाय गर्भाशयाचा किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झाला असेल तर स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

निदान

स्तनांच्या कर्करोगावर उपचारातील महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्याचे निदान लवकर होणे.

मॅमोग्राफी

ही चाचणी स्तनाच्या कर्करोगाच्या पाहणीसाठी वापरली जाते. ही चाचणी ३० मिनिटात पूर्ण होते. स्तनांमध्ये कर्करोगाची गाठ आहे का हे पाहण्यासाठी याचा वापर होतो. साधारण वयाच्या पस्तिशीनंतर दरवर्षी ही चाचणी नियमितपणे करुन घ्यावी.

अल्ट्रासाऊंड -

सोनोग्राफी करूनही परीक्षण केले जाऊ शकते.

बायोप्सी

 यामध्ये शरीरतील पेशी किंवा उती यांचा एक नमुना घेऊन त्याची तपासणी केली जाते. बायोप्सीमुळे कर्करोग आहे किंवा नाही याचे निश्चित निदान होऊ शकते.

स्वपरिक्षण

स्वतःच हाताने स्तनांचे परीक्षण करुन स्तनांच्या जागी गाठ किंवा गोळा आला आहे का नाही याची खात्री करणे. झोपून, उभे राहून, आरशात पाहून ही तपासणी आपण करु शकता.

स्त्रीरोग तज्ज्ञ तपासणी  -

वयाच्या तिशीनंतर स्त्रीरोग तज्ज्ञाकडून नियमित वार्षिक तपासणी करुन घ्यावी.

उपचार-

स्तनांच्या किंवा कोणत्याही कर्करोगावर शस्त्रक्रियेने गाठ काढून टाकणे आणि किमोथेरेपी घेणे हा उपाय बहुतेकांनी ऐकलेला असतो. पण सुरुवातीला स्तनामध्ये असलेल्या गाठीचे कारण डॉक्टरांना विचारावे कारण प्रत्येक गाठीवर उपचारांची आवश्यकता नसते. काही वेळा स्तनांमध्ये संसर्ग असल्यास केवळ प्रतिजैविकांनी त्यावर उपचार केला जाऊ शकतो. नुसतीच गाठ असेल तर ती औषधांनी निघून जाते.

मात्र डॉक्टरांनी निदान केल्याप्रमाणे जर स्तनाच्या कर्करोगाची गाठ असेल तर त्यावर खालील उपचार केले जाऊ शकतात.

लुम्पेक्टॉमी-

स्तनाच्या कर्करोगाची गाठ शस्त्रक्रियेने काढली जाते. स्तनाचा कर्करोग दुसरीकडे पसरू नये म्हणून ही शस्त्रक्रिया केली जाते.

मास्टेक्टोमी-

या शस्त्रक्रियेत कर्करोगग्रस्त स्तन पूर्णपणे काढून टाकला जातो. शस्त्रक्रिया सुरु करण्याअगोदर नसेतून ड्रिप दिले जाते किंवा औषधे दिली जातात. शस्त्रक्रियेदरम्यान एक इलेक्ट्रोकार्डियोग्राम मशीन रुग्णाचे निरिक्षण क़रण्यासाठी लावलेले असते. त्यानंतर रुग्णाला अनेस्थेशिया दिला जातो. मास्टेक्टॉमी चे कर्करोग किती पसरला आहे त्यानुसार ५ प्रकारात ही केली जाते.

किमोथेरेपी-

यामध्ये शस्त्रक्रियेनंतर रक्तवाहिन्यांतून पुन्हा कर्करोग बळावू नये म्हणून औषधे दिली जातात.

रेडिएशन-

कर्करोगाशी लढण्यासाठी यामध्ये रेडिओअ‍ॅक्टीव्ह किरणांचा वापर करतात. याचा वापर कर्करोगाचा उपचार, गाठीचा आकार आणि स्थितीवर अवलंबून असतो.

स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचारांनंतर काळजी घेणे आवश्यक असते.

सतत झोपणे किंवा आराम क़रणे टाळावे. शरीर सक्रीय राहण्यासाठी व्यायाम करावा. त्यामुळे नसांमध्ये गाठी होणे टाळता येते. वेदना अधिक होत असतील तर वेदनाशामक गोळ्या घ्यावा. अतिजड सामान उचलू नये. छाती आखडू नये, खाज येऊ नये म्हणून व्यायाम करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घ्यावी. या काळात सुपाच्या आणि आरोग्यदायी आहाराचे सेवन करावे. तेलकट, चरबीयुक्त आहार घेऊ नये. मद्यपान, धूम्रपान करू नये

स्तनाच्या गाठी शिवाय आणखी एक समस्या असते ती म्हणजे दुधाच्या गाठी होण्याची. स्त्रियांच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणाèया ग्रंथी आणि चरबी निर्माण करणाèया ग्रंथी असतात. प्रसुतीनंतर सुमारे दीड ते दोन वर्षे सतत दुधनिर्मितीचे कार्य सुरुच असते.

दुधाच्या गाठी-

प्रसुतीनंतर काही समस्या भेडसावल्याने माता बाळाला दूध पाजत नाही किंवा स्तनाग्रांना चीर पडल्यास दुखरेपणामुळे त्या बाजूला दुध पाजताना त्रास होतो त्यामुळे पाजणे टाळले जाते. मात्र त्या स्तनामध्ये दूध निर्मितीची प्रक्रिया अखंड सुरु असते. बाळाला न पाजल्याने हे दूध स्तनांमध्ये साठून राहाते आणि त्यामुळे स्तनांमध्ये दुधाच्या गाठी निर्माण होतात. त्यातून जंतूसंसर्ग होतो. दूध साठून कधी कधी स्तनातून बाहेर पडते मात्र ते न पडल्यास गाठी तयार होतात त्या सुरुवातीला मऊ असतात पण चार पाच तासांनंतर घट्ट होतात. अशा वेळी दूध पिळून बाहेर काढले नाही तर बाहेरुन त्यात जंतु शिरतात आणि मग गळू तयार होते. गळू झाल्यास स्तन आकाराने कडक आणि मोठे होतात. स्तन गरम लागतो. शिवाय वेदनाही होतात. स्तनाला झालेल्या या गाठी मध्ये जर पू झाला तर मात्र शस्त्रक्रिया करुन पू काढावा लागतो.

दुधाची गाठ होणे टाळता येऊ शकते. यासाठी बाळाला वेळच्या वेळी दूध पाजणे आवश्यक असते. ते शक्य नसल्यास दूध काढून टाकावे. जेणेकरून दूध स्तनांमध्ये राहणार नाही आणि त्याचा निचरा होईल

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी स्तनाला आलेली गाठ ही कर्करोगाचीच असेल असे गरजेचे नाही. त्यामुळे स्तनाला आलेली गाठ ही दुधाची आहे, साधी आहे किंवा कर्करोगाची हे तपासणी केल्याशिवाय निष्कर्ष न काढणेच योग्य ठरते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon