Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

प्रसूतिकक्षात जाण्याआधी या ६ गोष्टी लक्षात असू द्या.

प्रसूतिवेदना आणि बाळाचा जन्म हे एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय आणि वेदनादायक क्षण असतात. ही अशी वेळ असते, जेव्हा तुम्ही खूप दुःख सोसता आणि तरीही याची निष्पत्ती तुमचे स्वतःचे बाळ- तुमच्या आयुष्याची सर्वोच्च निर्मिती होण्यात होते. प्रसूतिदरम्यान पुष्कळ गोष्टी घडतात आणि त्यावेळी बाळाची तुमच्याशी भेट घडवून आणण्यात खूप कमी लोकांचा सहभाग असतो. म्हणून, जेव्हा खरोखर तुम्ही प्रसूतिकक्षात प्रवेश करता; त्याअगोदर प्रसूतीबाबत काही गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. त्या गोष्टी पुढीलप्रमाणे:

१. डॉक्टरांवर विश्वास ठेवा

अनेकदा मातांना असे वाटते की, डॉक्टर आणि त्या स्वतः हे एकदम विरुद्ध बाजूंनाच आहेत आणि डॉक्टर हे मातांसाठी योग्य त्या गोष्टी करत नाहीत! परंतु वास्तवात तसे काहीच नसते. डॉक्टर्स, परिचारिका आणि सुईण हे सर्व तुमच्या मदतीसाठीच असतात आणि ते तुमचे बाळ तुमच्यापर्यंत सुखरुप यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. म्हणून तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवणे आणि त्यांना ते जे करतात, ते करु देणे हे अत्यावश्यक आहे.

२. प्रसूतीच्या योजना

जेव्हा आपण प्रसूतीचे पूर्वनियोजन करत असतो, तेव्हा हो; त्या सर्व योजना छान आणि चांगल्या वाटतात. परंतु वास्तविक प्रसूतिदरम्यान बहुतेक योजना बेकार ठरतात. प्रसूतिवेदना आणि बाळाचा जन्म कधी होणार, यांचा आपण अचूक अंदाज वर्तवू शकत नाही. म्हणून तुम्हाला या अनिश्चिततेसाठी तयार व्हावे लागेल. तथापि नेमके काय घडणार आहे, याची साधारण रुपरेषा सारखीच असते. म्हणून प्रसूतीची मानसिक योजना हे तुमच्या मनाला आणि शरीराला तयार करण्यात मदत करेल.

३. तुमची योनी अनेकांच्या दृष्टीस पडेल:

निश्चितच तुम्हाला ही माहिती पचायला अवघड जाणार आहे. हो, तुमचा सर्वाधिक खाजगी असलेला शारीरिक अवयव तुमचा पती सोडून किमान ३ लोकांकडून पाहिला जाणार आहे. अशा परिस्थितीसाठी अर्थातच तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार राहण्याची गरज आहे. अन्यथा प्रसूतिकक्षाच्या टेबलावर असताना तुम्हाला हे ध्यानात येईल आणि तेव्हा डॉक्टर्स आणि नर्स तुम्हाला तुमच्या मांड्या पसरवायला सांगत असतील.

४.  नेहमी तुमच्या मनाचे ऐका

ही सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे. तुमचे बाळ तुमच्या शरीराबाहेर येण्याअगोदर सुद्धा तुम्हाला ते मातृत्वाच्या अंतःप्रेरणेतून जाणवून येईल. या बाळंतपणाच्या प्रत्येक टप्प्यात तुम्ही त्या अंतःप्रेरणेकडे लक्ष द्या, असा आमचा तुम्हाला सल्ला आहे. जर तुम्हाला काही गडबड आहे, असे वाटत असेल; तर त्याविषयी डॉक्टर किंवा तुमच्या पतीशी बोला. आणि जर तुम्हाला तुमच्या आसपासची एखादी गोष्ट हवी आहे, असे वाटत असेल; तर ती मिळवा. तुमच्या बाळाला ते बाहेर आल्यावर काय हवे आहे, हे ते आत्ता सांगत असेल!

५.  बाळाला घरी नेण्यासाठी तयार आहात?

प्रसूतिवेदना चालू असताना अचानक अनेक महिलांना साक्षात्कार होतो की, त्यांनी आतापर्यंत पाहिजे त्या गोष्टींची पूर्तता केली नाहीय; आणि त्या बाळाला घरी नेण्यासाठी त्या अजून तयार नाहीत असे त्यांना वाटू लागते! पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे, जेव्हा तुमच्या हातात तुमचे बाळ येईल; त्याच क्षणी तुम्ही यासाठी तयार व्हाल. जरी तुमच्या घराचा बोजवारा उडाला असेल किंवा तुम्हाला परिपूर्ण असा बाळाचा पलंग मिळाला असेल वा नसेल, याने काही फरक पडत नाही. फक्त चिंता करणे सोडा आणि लक्षात ठेवा, तुम्ही एक सर्वोत्तम आई बनणार आहात!

६. खूप बदल घडून येणार आहे:

जरी बहुतेक स्त्रियांना त्या गर्भवती झाल्यावरच या गोष्टीची जाणीव होते; तरी त्या जेव्हा रुग्णालयात असतात आणि बाळाला जन्म देणार असतात तेव्हा त्यांना याची खरी प्रचीती येते. तुम्हाला माहित असलेले आयुष्य एक मोठे वळण घेणार आहे आणि त्यातील बदल हे चांगल्यासाठीच घडणार आहेत. म्हणून तुम्हाला मनात हळूहळू याची तयारी करावी लागेल आणि यामुळे तुम्ही अचानक प्रभावित होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागेल. कारण तुम्ही एक आई बनणार आहात आणि आता तुमचे एक नवे विश्व आकारास येणार आहे!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon