Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

बाळातील व्यंग कसे कळते ?

जन्माला येणारे बाळ निरोगी आणि सुदृढ असावे असे प्रत्येक आईला वाटते,हो ना? गरोदर असतांना बाळ आणि तुमच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी अनेक तपासण्या केल्या जातात. अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळ अगदी भ्रूणावस्थेत असतांनाच संभाव्य दोषांची तपासणी करणे आता शक्य आहे. हे बाळातले व्यंग कसे कळते त्याकरता कोणत्या चाचण्या करण्यात येतात हे आपण पाहणार आहोत.

बाळातील व्यंग कसे कळते?

गरोदरपणाच्या दहाव्या व अकराव्या आठवडय़ापासून सोनोग्राफीतून बाळाच्या अवयवांचा विकास नीट होत आहे ना हे कळते. सोनोग्राफीत आपल्याला प्रतिमा दिसत असल्यामुळे शरीराच्या जडणघडणीतील व्यंग त्यातून समोर येऊ शकते.

यामध्ये दुभंगलेले ओठ, टाळूला असणारे छिद्र, हृदयाला छिद्र असणे, हात-पायचा विकास न झाल्यामुळे हे अवयव नसणे किंवा अर्धवट विकास झाल्यामुळे हाता-पाय अर्धवट असणे, नाक किंवा कान नसणे, किंवा नाकाच्या-कानाच्या जागी फक्त छिद्र असणे. इतर अवयवाची अपूर्ण वाढ किंवा कमी आकारमान असणे , डोक्याचा वरचा भाग विकसित नसणे, पाठीच्या कण्याची अपूर्ण वाढ या गोष्टी त्यातून दिसू शकतात.

मार्कर तपासण्या

या तपासण्यांमध्ये ,मार्कर तपासणी बाळातील जन्मजात दोष आणि गुणसूत्रीय आजारांचे निदान करण्यासाठी केली जाते. तुमच्या बाळातील संभाव्य दोष ,विशेषतःडाऊन्स सिंड्रोम आणि इतर गुणसूत्रीय आजारांची पडताळणी याद्वारे केली जाते. या आजारांमुळे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर परिणाम होतो यामुळेच गर्भावस्थेच्या पहिल्या आणि दुसऱ्या त्रेमासिकांमध्ये या चाचण्या आवर्जून केल्या जातात.

बाळाला व्यंग असण्याचा धोका किती ही शक्यता कळण्यासाठी करण्यात येणाऱ्या ‘डबल मार्कर’ वा ‘ट्रिपल मार्कर’ चाचण्याबाबत जाणून घेऊया

१. डबल मार्कर तपासणी

गर्भावस्थेच्या १०-१३ आठवड्यांदरम्यान डबल मार्कर तपासणी केली जाते. भ्रुणातील डाउन्स सिंड्रोम,ट्रायसोमी १८ आणि ट्रायसोमी २१ या आजारांची शक्यता पडताळण्यासाठी ही चाचणी करतात. रक्ताच्या तपासणीदवारे PAPP-A आणि HCG मार्कर आणि गुणसूत्रीय दोषांची निश्चिती करण्यासाठी अल्ट्रासाऊंड नुचल केले जाते. इतर जास्तीच्या तपासण्या करण्याची आवश्यकता आहे की नाही हे डॉक्टरांना समजण्यासाठी या चाचण्या महत्वाच्या असतात. बाळाच्या मानेचा मागच्या बाजूचा अर्धपारदर्शक भाग ,जो द्रव पदार्थ आणि इतर दाट घटकांनी बनतो यास [Nuchal Translucency] NT असे म्हटले जाते. हा भाग १४ आठवड्यानंतर नाहीसा होतो म्हणून हि तपासणी १४ आठवडांच्या आत करणे गरजेचे असते.

२. ट्रिपल मार्कर तपासणी

गर्भावस्थेच्या साधारणतः १४-२० आठवड्यांदरम्यान ट्रिपल मार्कर तपासणी केली जाते. बाळाला असू शकणाऱ्या डाउन्स सिंड्रोम,एड्वर्डस सिंड्रोम आणि मज्जासंस्थेशी संबंधित इतर दोषांची पडताळणी या चाचणीद्वारे केली जाते.

बाळाच्या नाळेमध्ये असणाऱ्या अल्फा-फेटोप्रोटीन[ AFP] ,ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन [HCG]आणि आस्ट्रियॉल चे प्रमाण यात तपासले जाते. या सोबतच इन्हीब्लिन A चे प्रमाण तपासण्यासाठी क्वाड्रापल मार्कर तपासणी करण्याचा ही पर्याय उपलब्ध आहे.

वरील चाचण्यांमधून व्यंग असण्याची शक्यता शोधता येते. पण प्रत्यक्ष व्यंग त्यातून शोधता येत नाही. ज्या गरोदर स्त्रियांच्या बाबतीत बाळाला व्यंग असण्याची शक्यता दिसून येते, त्या स्त्रीच्या गर्भजलची तपासणी सोळाव्या आठवडय़ाच्या सुमारास करण्यात येते. यातून बाळाला असणारे व्यंग शोधून काढण्याचा प्रयन्त करण्यात येतो.

ही सहजा-सहजी करण्यात येणारी चाचणी नसून गरज असेल तरच ही तपासणी करतात. यात गर्भात बाळाच्या भोवती असलेल्या पाण्याची चाचणी केली जाते. खरंतर या चाचणीचा उपयोग बाळाला असलेले डाऊन्स सिंड्रोमसारखी क्रोमोझोमल अबनॉर्मिलिटी कळण्यासाठी करण्यात येतो.

या तपासण्यांनंतर व्यंग असल्याचे नक्की कळते का ?

बहुतांश प्रकरणात या तपासण्यानंतर  व्यंग समजून येण्याची शक्यता जास्त असते. पण काही प्रकरणात या तपासण्यांनंतर सुद्धा काही व्यंग न कळून आल्याची उदाहरणे देखील आहेत. काही व्यंग गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यानंतर तसेच प्रसूती होई पर्यंत कळून न आल्याची उदाहरणे देखील आहे. ज्या गरोदर स्त्रियांना बाळातील व्यंग लवकर कळून येते, त्यांना डॉक्टर गर्भपाताचा सल्ला देखील देतात. हा सल्ला देण्याआधी डॉक्टर आईला या गर्भपातामुळे काही समस्या निर्माण होणार नाही ना याची काळजी घेऊन मग निर्णय देतात. तसेच काही बाळातील व्यंग त्याच्या जन्मानंतर देखील कळू शकते.

महत्वाचे- वरील माहिती वाचून घाबरून जाण्यासारखे काही नाही. गरोदर असताना योग्य डॉक्टरांचा सल्ला, आणि ते सांगतील त्या तपासण्या वेळच्या वेळी कराव्या. 
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon