Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

पालकत्वाचे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का ?

​_

लग्न झाल्यावर नवरा बायको दोघेही आपापल्या विश्वात मग्न असतात. प्रत्येकाचे जग वेगळे असते ते काही प्रमाणात एकत्र होते. एकमेकांच्या साथीने विविध गोष्टींचे अनुभव, आनंद घेत असतात. दोघे जण आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी स्वतंत्रपणे जपताही येतात. पण लग्न झाल्यानंतर एक प्रश्न थेट किंवा आडून विचारला जातो तो म्हणजे बाळाबाबत काय विचार किंवा चान्स कधी घेणार. जोडपे स्वतंत्र राहात असले तरीही ह्या प्रश्नांना सामोरे जावे लागतेच.

सध्या डिंक म्हणजे डबल इन्कम नो किडस चा प्रभाव दिसतो. थोडक्यात दोघेही कमवत असतात पण मुलांची जबाबदारी नसते. मूलाचा विचार करण्याबाबतही साशंकता असते. मुलांची जबाबदारी पेलण्याची मानसिक क्षमता नसते किंवा भीतीही वाटत असते. काही जोडप्यांना मूल हवेच कशाला दोघे एकमेकांसाठी आहोत असे वाटते. पण कुटुंब होण्यासाठी मूल असायला पाहिजे. मूल झाल्याने जशा काही जबाबदाऱ्या वाढतात तसेच काही सकारात्मक गोष्टीही आयुष्यात घडतात त्या नक्कीच सुखद असतात. शिवाय आईवडिलांनी जबाबदारी निभावली म्हणून आपण असतो. सकारात्मक पालकत्व निभावू शकतो की नाही याची देखील काळजी वाटत असावी. मात्र पालकत्व किंवा मूल सांभाळणे हे शिकता येऊ शकते. मुळात बाळ झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलतात. त्या बदलांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी असणे महत्त्वाचे आहे.

तरीही बाळ झाल्यानंतर काही गोष्टी बदलणार पण त्या सकारात्मकतेने या सगळ्यांचा सामोरे गेल्यास आयुष्य अधिक आनंदी होऊ शकते.

स्वतःपुरता विचार बाजूला-

बाळ येणे किंवा पालक होणे हा चोवीस तासाचा अनपेड जॉब आहे असे म्हणू शकतो. रादर बाळ झाल्यानंतर आपसूकच स्वतःपुरता विचार बाजूला पडतो. बाळाच्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच पहाव्या लागतात शिवाय त्याच्या गरजा ओळखून त्या पुऱ्या कराव्या लागतात. दुसऱ्यासाठी निरपेक्ष काही करण्यातले प्रेम बाळ आल्यावर जाणवते.

जोडपे नव्हे कुटुंब

जोडपे म्हणून वावरण्यातला आनंद वेगळाच असतो पण जेव्हा बाळ होते तेव्हा जोडपे कुटुंबात परावर्तित होते. त्यामुळे नवरा बायको यांच्यातील एक बंध म्हणजे ते बाळ असते. बाळ येण्याआधीचे आयुष्य वेगळे असले तरीही ते अपूर्ण होते अशीही जाणीव बाळाला हातात घेतल्यानंतर जाणवू शकते. 

घराची ओढ

बाळ येण्यापुर्वी दोघेही जण आपापल्या विश्वात रममाण असतात. नोकरी, व्यवसायातील लक्ष्य साध्य करण्यात अधिक स्वारस्य असते. त्यासाठी वेळेकडे लक्ष जात नाही. काही वेळा खूप उशिरा घरी आल्यावर नकोसे वाटते कारण एकाकीपणा जाणवतो. बाळ झाल्यावर घरची ओढ वाटते. नोकरी, व्यवसायातील कामे वेळेवर पटकन संपवून घरी परतायची आणि बाळाला पाहण्याची ओढ निर्माण होते. वेळेचे बंधन आल्याने स्वातंत्र्यावर घाला अशी भावना निर्माण होते पण ती फार काळ टिकत नाही. कारण मुलांची ओढ, प्रेम ती टिकू देत नाही.

मुलांचे प्रेम, माया

घरी आल्यानंतर बाळाच्या लीला पाहून सगळा थकवा दूर होतो. त्यामुळे उत्साह वाढतो. आपल्याला पाहून मुलांना होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून, खेळण्यातून दिसतो. मग त्यांच्याबरोबर आपणही रममाण होतो.

मुले शिक्षक

मुलांना वाढवताना चांगले वाईट याची माहिती दिली जाते. मुलांमुळे आपल्याही वागण्याला, सवयींना, बोलण्याला एक प्रकारची शिस्त लागते.

मुलांबरोबर जगा बालपण-

मुलांबरोबर त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करताना आपणही त्यात रमून जातो. पुन्हा एकदा आपले बालपण जगतो आहोत का असे वाटू लागते पेक्षा मुलांबरोबर आपणही लहानपण पुन्हा जगून घेतो. मुलांबरोबर विविध खेळ, यात्रा, जत्रा यांच्यात सहभागी होतो. थोडक्यात आपल्या बालपणाचा आनंद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो.

'

एकटेपणा नाही

मुले शाळेत गेली नसतील तर घरी एकटेपणा जाणवत नाही. ती सतत आजूबाजूला असल्याने घर भरल्यासारखे वाटते.

पालकांबद्दलचा आदर वाढतो

मूल झाल्यानंतर आपल्या पालकांविषयीचा आदर वाढतो. विशेषतः आई तिच्या सारख्या परिस्थितीतून गेल्याने तिच्या कष्टांची जाणीव होते. त्यामुळे आईबद्दल आदर दुणावतो. पालक म्हणून त्यांनी केलेल्या पण आपल्याला चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टी समजून घेण्यास मदत होते.

आरोग्याची काळजी

बाळाची जबाबदारी असल्याने पालक म्हणून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ लागता. चांगले पालकत्व निभावण्यासाठी याची गरज असल्याने त्यासाठी विशेष प्रयत्न करता.

धीर आणि प्रेम

पालक झाल्यानंतर पेशन्स किंवा धीर वाढतो. मुलांच्या एकसारख्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला उत्तरे देणे असो किंवा त्यांना एखादी गोष्ट शिकवताना लागणारा धीर आणि प्रेम असो. बाळ झाल्यानंतर हे बदल आपसूकच घडतात.

 

एकटेपणा

बाळापाठी गुंतल्याने एकटेपणा जाणवत नाही. वय वाढल्यानंतर मोठी झालेली मुलेही मदत करतात. सहजच काही गोष्टी शिकवतात किंवा जबाबदाऱ्या पेलतात. त्यामुळे वय वाढले तरी एकटेपणा जाणवत नाही. म्हातारपणी बाळलीला आठवून मन प्रसन्न होते आणि हास्यही उमटते. मुलांना पालक म्हणून वाटणारा अभिमान सरत्या वयात आनंद मिळवून देतो.

जोडीदाराशी जवळीक

मुले झाल्यावर ती मोठी होताना पाहाताना आपल्या जोडीदाराबरोबर अनेक अनुभव घेतले जातात. त्यामुळे जोडपे म्हणूनही अधिक जवळीक निर्माण होते. बाळ येणे हे जोडप्यातील प्रेम द्विगुणित करतेच शिवाय काळजी, ममत्व या गोष्टींनाही अधिक महत्त्व दिले जाते.

एकुणात बाळाचा वैवाहिक जीवनातील प्रवेश हा अधिक आनंददायी असतो. बाळामुळे अनेक लोक जवळ येतात. अनेक अनुभव नव्याने अनुभवता येतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon