Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

निद्रानाश म्हणजे काय आणि त्याची कारणे

झोप म्हणजे वेळ वाया जाणे किंवा मेंदू अक्रियाशील असणे हे काही गैरसमज झोपेबाबत असतात. व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असतात तशीच झोप ही देखील महत्त्वाची गरज आहे. उत्तम झोप ही शारिरीक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. शरीराचे कार्य योग्य पद्धतीने सुरु रहावे यासाठी झोप ही अत्यावश्यक व्यवस्थापनातील भाग आहे. झोपेमध्ये मेंदू निष्क्रीय नसतो तर जागेपणाच्या तुलनेत थोडा अधिकच कार्यशील असतो. मुळात झोप ही मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात आली पाहिजे.

चांगल्या झोपेचे फायदे-

शांत पुरेशी झोप झाल्यास रक्तदाब योग्य असल्याने हृदय निरोगी राहते तर तणावाशी निगडीत संप्रेरके कमी प्रमाणात स्रवल्याने ताणतणाव कमी होतो. मेंदू झोपेतच दिवसभरातील घटना साठवून ठेवतो त्यामुळे पुरेशी झोप झाल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रता चांगली राहाते. झोप चांगली झाली की व्यक्ती उत्साही आणि सतर्क रहातो. जास्त प्रथिनांची निर्मिती झाल्याने पेशी, स्नायूंची दुरुस्ती केली जाते. सेरोटोनिन हे नैराश्याशी निगडीत संप्रेरकाचे प्रमाण योग्य असल्याने नैराश्य कमी होण्यास मदत होते तर मानसिक तणावाबरोबर निर्माण होणारे शारिरीक आजार बरे होण्यास किंवाप्रतिबंध होण्यास मदत होते.

निद्रानाश एक विकार-

शांत झोपेचे हे सर्व फायदे निद्रानाश या एका आजारामुळे गमवावे लागतात तो आजार म्हणजे निद्रानाशाचा. मुळाच निद्रानाश हा एकविकार किंवा व्याधी आहे हे लक्षात घ्यायला हवे. या विकारामध्ये व्यक्तीला झोप येतच नाही किंवा कमी लागते. हा आजार मानसिक आहे आणि मुख्य म्हणजे त्याची लक्षणे चटकनकळू येत नाहीत. जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हाच याची तीव्रता जाणवते. सध्यातरी अधुनिक जीवनशैलीची ही भेट आहे असे म्हणायला हवे. कारण कामाचे तास वाढले आहेत.वेळा बदलल्या आहेत. व्यक्तीची झोप ही चार स्तरांमध्ये असते. त्यातील पहाटेच्यावेळी लागणारी झोप महत्त्वाची आहे ज्याला साखरझोप म्हणता येईल. याच काळात मेंदूच्या पेशी मजबूत होतात किंवा त्यांच्या दुरुस्तीचे कार्य होते. त्यामुळे झोप पूर्ण होणेअत्यंत महत्त्वाचे आहे.

निद्रानाशाची लक्षणे-

१ अजिबात झोप न येणे २ मध्यरात्रीत उठून बसणे आणि पुन्हा झोप न येणे ३ सकाळी खूप लवकर जाग येणे ४ झोपेतून उठल्यावरही आळसटल्या सारखे वाटणे किंवा थकवा जाणवणे. ५ स्वप्न पडणे आणि त्यामुळे दिवसभर अस्वस्थता राहणे.

निद्रानाशाची कारणे

तणाव-

काम, आरोग्य, आर्थिक आणि कुटुंब या पातळीवरचे ताणतणाव असल्यास त्यामुळे मेंदू रात्रीच्या वेळी क्रियाशीलच रहातो आणि हा ताण झोपेवर परिणाम करणारा असतो. त्यामुळे झोप लागत नाही. एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन, घटस्फोट किंवा नोकरी जाणे या गोष्टींमुळेही तणावात वाढ होऊन निद्रानाश जडू शकतो.

अतिप्रवास किंवा प्रवासाची नोकरी-माणसाच्या शरीराचेही एक घड्याळअसते त्याबर हुकुम शरीर काम करत असते. ह्या घड्याळ्याप्रमाणे आपण झोपतो किंवा जागेहोतो आणि मुख्य म्हणजे या सर्वांवर आपली चयापचय क्रिया आणि शरीराचे तापमान अवलंबून असते. शरीराचे हे घड्याळ जेव्हा बिघडते तेव्हा निद्रानाशाचा विकार जडतो. अतिप्रवास किंवा सतत प्रवास असणाèया व्यक्तींना ही व्याधी जडू शकते. विशेषतः विमान प्रवास करणाèयांना जेट लॅगचा त्रास होतो तर सकाळी लवकर कामाला जाणे किंवा रात्रपाळी या दोन्हींचा त्रास होतो.

झोपेच्या चुकीच्या सवयी-

झोपेची वेळ अनिश्चित असेल किंवा अधून मधून डुलका काढण्याची सवय, झोपेसाठीप्रतिकूल वातावरण, बेडवरून बसून काम करणे, झोपताना टीव्ही, मोबाईल पाहणे, व्हिडिओगेम्स खेळणे इत्यादींमुळे झोपेच्या चक्रावर वाईट परिणाम होतो.

संध्याकाळच्या वेळात अतिखाणे-

झोपण्यापुर्वी थोडी भूक राखून काही खाल्ले तर ते योग्यच आहे. पण झोपण्यापुर्वी भरपेट किंवा तडस लागेपर्यंत जेवणे हे नक्कीच शारिरीकदृष्ट्या अस्वस्थ करणारे असते. अतिआहारामुळे छातीत जळजळ होणे, घशाशी येणे असे त्रास होतात.अर्थातच त्यामुळे अस्वस्थता वाढल्याने झोप येत नाही. परिणामी हीच सवय असेल तर निद्रानाशाची व्याधी जडते. 

गंभीर निद्रानाशासाठी काही वैद्यकीय कारणेही असतात.

मानसिक विकार-

काही वेळा मानसिक विकारामुळेही तणावग्रस्त झाल्याने झोप येत नाही. नैराश्य आलेल्या व्यक्तींना खूप लवकर जाग येते. निद्रानाश हे मानसिक अनारोग्याचे लक्षण असते.

औषधोपचार-

काही प्रकारच्या औषधांमुळे झोप न लागण्याची समस्या जाणवू शकते. नैराश्यातून बाहेर पढण्यासाठी किंवा दमा, रक्तदाब यावर दिली जाणारी औषधे ही झोप न येण्यास कारणीभूत ठरतात.

आजारपण-

काही आजारपणांमध्ये जसे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, दमा, पचनसंस्थेशी निगडीत आजार, थायरॉईड, पार्किन्सन्स, अल्झायमर या आजारामध्ये झोप कमी किंवा येतच नाही.

झोपेशी निगडीत आजार-

काही व्यक्तीचा श्वास झोपेत खंडीत होतोे त्यामुळे त्यांना ठराविक अंतराने जाग येते. तसेच पाय दुखत असतील किंवा पायात पेटके आले तरीही शांत झोप लागत नाही.

कॅफिन, टॅनिन, मद्यपान-

कॉफी, चहा, तंबाखू, धूम्रपान सारखी पेये ही उत्तेजक असतात. झोपण्याआधी ही पेये घेतल्याने मेंदूला सतर्क किंवा उत्तेजित होण्याचा संदेश मिळतो. त्यामुळे झोपण्याच्या आधी ही पेये घेतल्यास किंवा धूम्रपान केल्यास झोप येत नाही.

निद्रानाशाचा त्रास टाळण्यासाठी काही उपाय जरुर करता येतात. त्यात मूलभूत गोष्ट हीच की जीवनशैलीत बदल करा. तसेच निद्रानाशाची मानसिक, शारीरिक कारणे ओळखा त्यावर उपाय योजना करायला हवी. अगदीच गंभीर अवस्था असेल तर औषधोपचार घेण्यासाठी तज्ज्ञांकडे जाण्यास हयगय करु नका. घरगुती पातळीवर काही उपाय अवश्य करता येतात.

शक्यतो रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित असावी.

संध्याकाळ नंतर चहा कॉफी सारखी उत्तेजक पेये घेऊ नयेत.

भरपूर व्यायाम करावा. मात्र झोपण्याच्या वेळेपुर्वी किमान चार तास व्यायाम केला पाहिजे.

रात्री भरपेट आणि जड आहार घेऊ नका. झोपण्यापुर्वी किमान दोन तास आधी जेवावे.

झोपण्यापुर्वी ध्यानधारणा, संगीत ऐकणे शक्य असल्यास अंघोळ करावी.

तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे झोपताना मनात कोणतेही तणावाचे विचार येऊ देऊ नये. किमान झोपेच्या वेळी स्वयंसूचना देऊन त्यावेळी ते विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा.

शक्यतो झोपेची वेळ ठरवून घ्यावी आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार शांत आणि पुरेशी झोप कशी मिळेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. कारण पुरेशी झोप हे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाची आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon