Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

प्रत्येक नवीन पालकांना पडणारे प्रश्न


पालकत्व म्हणजे आयुष्याचा सर्वात महत्वाचा काळ. पालकत्व म्हणजे आई-बाबा त्यांचे नाव, त्यांच्याकडचे जीवनावश्यक ज्ञान मुलांना देतात आणि मुले पालकांच्या जाण्यानंतरही अनेक वर्षे त्यांचे नाव पुढे नेतात. मुळात आपले अस्तित्वच आपण आपल्या मुलांच्या रुपात पुढे नेत असतो.

पण पालक असणे म्हणजे सोप्पे काम नाही. आपल्या सगळ्या गोष्टींचा मुलांवर परिणाम होत असतो. मुले पालकांचे अनुकरण करत असतात आणि त्यामुळेच ही एक जबाबदारी असते. अनेकदा अनुभव नसल्यामुळे मुलांसंबंधी काही गोष्टीत तुम्हाला प्रश्न पडतात. हे प्रश्न ओळखून त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही इथे दिली आहेत. तुम्हाला देखील हेच प्रश्न पडले आहेत का ?

१. ‘’ प्रत्येक वापरानंतर दुधाच्या बाटलीला स्टेरलाइझ (जंतुविरहित) करणे गरजेचे आहे का ?’’

दुधाची बाटली किंवा खाण्याची वाटी, चमचा ह्यांना वापरानंतर पाण्यात उकळून स्टेरलाईझ करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. या प्रक्रियेमुळे कोणत्याही प्रकारचे जंतू बाटलीवर राहत नाहीत आणि जंतुसंसर्ग होण्याचा धोका टाळतो. त्यामुळे शक्य असेल तेंव्हा वारंवार या बाटल्यांना जंतुविरहित करा. प्रत्येक वापरानंतर हे करणे शक्य नसते त्यामुळे दिवसा या बाटल्यांना तुम्ही साबणाने धुवू शकता आणि रात्री स्टेरलाईझ करा म्हणजे रात्रीतून वाढणारे जंतू त्यावर जमा होणार नाहीत.

२. ‘’बाळाचे मल हिरवट रंगाचे असणे सामान्य आहे का?”

हा प्रश्न अनेकदा पालकांकडून विचारला जातो. अनेकदा बाळाच्या विष्ठेचा रंग वेगळा असल्यामुळे आई गोंधळून जाते. पण तुमचा माहितीसाठी सांगायचे तर बाळाच्या विष्ठेचा बदलणारा रंग ही समान्य गोष्ट आहे. हिरव्या रंगाचे मल अगदी सामान्य बाब आहे. तुमच्या बाळाला काहीही झालेले नाही त्यामुळे काळजी करू नका. अनेकदा मातेचे दुध किंवा फॉर्म्युलाचे दुध यामुळे बाळाच्या मलाचा रंग हिरवट होऊ शकतो. स्तनपानातील मागचे दुध या रंगाला कारणीभूत असते.

पण जर बाळाला लाल, काळी किंवा पांढऱ्या रंगाची शी होत असल्यास डॉक्टरांना दाखवा.

३. “ बाळाला दिवस आणि रात्र यामध्ये फरक कळतो का ?”

नाही. बाळ अजून अतिशय लहान आहे. त्याचा दिवस आणि रात्र याच्यातील फरक न कळून गोंधळ उडू शकतो. बाळाला हा फरक न कळल्यामुळे कधी कधी ते दिवसभर झोपते आणि रात्रभर जागते. प्राण्यांप्रमाणे माणूस घराबाहेर राहत नसल्यामुळे रात्री देखील आपल्या घरात लाईट चालू असतात. त्यामुळे बाळाचा उजेड आणि अंधार यातील फरक जाणून दिवस आणि रात्र ओळखण्यात गोंधळ होऊ शकतो. यासाठी बाळाला दिवसा बाहेर फिरायला घेऊन जा आणि रात्र झाल्यावर झोपल्याची सवय लाऊन दया. आपोआप त्याच्या शरीराला याची सवय होईल.

४. “ झोपलेल्या बाळाला उठवणे योग्य आहे का?”

या प्रश्नाचे उत्तर तुम्ही त्याला कोणत्या कारणासाठी उठवत आहात यावर अवलंबून आहे. बाळ शांत झोपले असेल आणि तुम्ही केवळ खेळण्यासाठी त्याला उठवत असाल तर हे अयोग्य आहे. कारण झोपमोड झाल्यास लहान बाळे चीडचीडे होतात आणि याचा परिणाम त्यांच्या रडण्यात होतो. शांत आणि पूर्ण झोप बाळासाठी अतिशय महत्वाची आहे. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही त्याला स्तनपानासाठी उठवत असाल तर ते अगदी योग्य आहे. झोपेमुळे स्तनपानाची वेळ टळू न देता त्याला उठवून पाजल्यास चालते.

५. “ मी माझ्या बाळाला खूप जास्त वेळ कडेवर घेत आहे का?”

लहान बाळ हे त्याच्या सगळ्या कृतींसाठी इतरांवर अवलंबून असते. त्याचे गोंडस आणि लोभसवाणे रूप पाहून आपण त्याला मिठी मारणे आणि कडेवर घेणे पसंत करतो. कुठेही जातांना बाळाला कडेवर घेऊन फिरणे चुकीचे नाही. तुमचा संपूर्ण दिवस बाळासोबत जात असेल तर सहाजिक तुम्ही अनेकदा त्याला कडेवर घेत असाल किंवा मिठी मारत असाल. रात्री झोपतांना मात्र त्याला दररोज जवळ घेऊन झोपणे त्याला तुमची सवय लावू शकते. याने त्याला पुढे जाऊन एकट्याने झोपण्यात समस्या येऊ शकतात. तेंव्हा शक्य असेल तेंव्हा त्याला रात्री थोडे लांब झोपू दया. परंतु तुम्ही त्याच्या आसपास राहा. त्याला तुमची कधीही  गरज लागण्याची शक्यता असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon