Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

या प्रकारे फोन नात्यांमध्ये दुरावा आणत आहे.

मोबाईल फोन मुळे जग जवळ आले आहे. मोबाईलवरून सोशल मिडीया सहजपणे वापरता येतो. त्यामुळे अगदी जुने शाळकरी दोस्त मिळण्यापासून ते नव्या ओळखीही सहज होतात. काहीच दिवसांपुर्वी सोशल मिडीयावरून माहिती लीक झाल्याने गोंधळ झाला पण म्हणून सोशल मिडीया आणि मोबाईल यांचा वापर काही कमी झालेला नाही. मूलभूत गरजांमध्ये आता मोबाईलचा समावेश झाला आहे. जणू मोबाईल शिवाय कोणाचेही पान हलत नाही. अ‍ॅप्पल या जगप्रसिद्ध फोनचा निर्माता सीईओ स्टीव्ह जॉब्ज यांच्या शब्दांत सांगायचे तर मोबाईल हे संवादाचे प्रभावी माध्यम नाही तर आयुष्याचा एक मार्ग आहे.

वैयक्तिक संपर्कासाठी वरदान ठरलेला मोबाईल आता शाप ठरतोय की काय असे वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे हल्ली जो पहा, जेव्हा पहा तो मोबाईलमध्येच गर्क असतो. मोबाईलग्रस्त जीवनात तो जसा वरदान होता तसा तो आता शाप होऊ लागला आहे का असा प्रश्न उद्भवतो आहे.

फायदे-

मोबाईल जेव्हा आला तेव्हा संपर्कजाळे मजबूत झाले. कोणत्याही टोकावरून आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करुन त्याची ख्याली खुशाली विचारणे शक्य झाले. नात्याने बांधल्या गेलेल्या दोन व्यक्ती लांब असतील तर त्यांना संपर्क करण्याचे उपयुक्त साधन होते. जसे दोन वेगळ्या शहरात राहणाऱ्या जोडप्यांना एकमेकांच्या संपर्कात राहणे मोबाईल फोनवरून संदेश स्वरुपात किंवा फोनकॉलच्या स्वरुपात शक्य झाले. एकमेकांची काळजी घेणे शक्य झाले.

तोटे-

मात्र अभ्यासातून याची काळी बाजूही स्पष्ट होत आहे. फोनवरून संपर्कात राहणाऱ्या जोडप्यांमधील परस्परसंवाद मात्र तुटत चालला आहे. अगदी प्रेमातही सुरुवातीला भेटीदाखल स्मार्टफोन्स दिले जातात. पण जोडप्यांमधील विसंवादाचे ते एक कारणही ठरते आहे. पुरातन वाद इथेही सुरु होतो की माणूस विरुद्ध मशीन. सध्या प्रेमातील अडसर किंवा शत्रु म्हणून मोबाईलकडे पाहता येते. दोघांत तिसरा ची भूमिका आता मोबाईल फोनकडे आली आहे. थोडक्यात मोबाईल हे जोडीदाराची भूमिका निभावतात की काय असे वाटते आहे.

नात्यांमधील दुरावा-

मोबाईलची किती जरुरीचा आहे, त्याचा किती वापर केला जातो हे महत्त्वाचे नाही पण व्यक्तीला मोबाईलची किती गरज आहे हे महत्त्वाचे आहे. हल्ली मोबाईलवरचे अवलंबित्व वाढत चालले आहे. ज्या व्यक्ती मोबाईलवर अवलंबून असतात त्यांना जोडीदाराकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. ज्या व्यक्तींना असे वाटते की आपला जोडीदार मोबाईलवर अधिक काळ अवलंबून आहे त्यांचा नात्यातील रस संपून जातो.

चीनमध्ये झालेल्या एका निरिक्षणानुसार वाढत्या स्मार्टफोन्सच्या वापरामुळे चीनमध्ये कुटुंबांचे विभाजन होत असल्याचे निर्दशनास आले आहे. तर ७० टक्के विवाहित महिलांनी स्मार्टफोन्सच्या वापरामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. अर्थात ही परिस्थिती एकट्या चीन मधली नाही तर इतरही स्मार्टफोन्स ग्राहकांची तिच अवस्था होते आहे.

तरुण विवाहित जोडप्यांमध्ये मोबाईलचा अतिरेकी वापर हा मोठा अडथळा ठरताना दिसतो. नवराबायको दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायात व्यग्र असतात. काही वेळा घरी आणूनही काम करावे लागते अशा वेळी संवादापेक्षा विसंवादाचे रुप येते. अनेकदा जोडीदार काही महत्त्वाची गोष्ट सांगत असेल तेव्हाही मोबाईलवर संदेश पाठवणे, फोन घेणे हे प्रकार सुरु असल्याने जोडीदाराला दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होते.

त्याचप्रमाणे अभ्यासक ज्याचे वर्णन टेक्नोरेफरन्स ज्याचे वर्णन करतात ते क्वचितच घेतले जात असतील तरीही त्याने काही नकारात्मक घटनांची साखळी निर्माण होते तसेच तंत्रज्ञानाबद्दल विरोधाभास, नातेसंबंधांची दुय्यम गुणवत्ता, आयुष्यातील कमी समाधान आणि नैराश्याचा मोठा धोका निर्माण होतो.

मुले आणि मोबाईल फोन-

हल्ली अगदी १० वर्षांच्या मुलाकडेही मोबाईल फोन असतो क्वचित स्मार्टफोन्सही असतात. ते अनिर्बंधपणे त्याचा वापर करु शकतात. अर्थात मुलेही पालकांचे वर्तन पाहून शिकतात. मुलांना वेळ न देता पालक सतत स्मार्टफोन्सवर बिझी असतील तर मुलांनाही तीच सवय लागू शकते. मध्यंतरी एक व्हॉटसअप वाचनात आलेली गोष्ट सांगते. -

शाळेत शिक्षिका मुलांना माझी सर्वात मोठी इच्छा असा निबंध लिहायला सांगितला. त्या एका मुलाने मी मोबाईल झालो तर असा निबंध लिहिला. त्यामध्ये मोबाईल ला कशी व्हीआयपी वागणूक मिळते आणि प्रेमाने त्याची काळजी घेतली जाते. थकलेले बाबा ऑफिसमधून आले की मोबाईल घेऊन बसतील. आई रागावली तरीही मला सोबत घेईल. भावंड मला जवळ ठेवण्यावरून भांडतील. मोबाईल बंद पडला म्हणूनही काळजी करतील. पण मी सगळ्यांच्या जवळ असेल आणि सगळेच माझ्याकडे लक्ष देतील. हा मेसेज वाचून मीच स्वतः विचारात पडले आणि निरीक्षण केल्यावर ही परिस्थिती घरटी दिसून येते. अगदी शाळेच्या व्हॅनमध्ये सोडायला आलेल्या पालकांची मान खाली मोबाईलमध्येच असते.

मुळातच आईवडिल दोघेही नोकरी क़रणारे असतात त्यामुळे मुळातच मुलांना मर्यादित वेळ दिला जातो. त्यातही घरात मोबाईल वर डोके खूपसून बसलो तर मुलांना वेगळे काय पहायला मिळेल.

दुसरा एक प्रसंग डोळ्यासमोर घडलेलाच. मित्रमंडळी मिळून पोराबाळं कुटुंबासमवेत जेवायला हॉटेल मध्ये गेले होते. लहान मूल असल्याने त्याता पुरेसे जेवायला देऊन मगच हॉटेलमध्ये गेले होते. आता मुलेच ती गोंधळ, बडबड आणि उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे चमचे ओढ, डिश ओढ, काटा घे असे उद्योग सुरु झाले. सुरुवातीला नको नको मग ओरडून झाले तरी मुलेच ती शांत कशी बसायची. मग वडिलांनी खिशातल्या मोबाईलवर गाणी डाऊनलोड केली होती ती मुलाला लावून दिली आणि काय चमत्कार म्हणावा तसे मूल एकदम एका जागी शांतपणे पापणी न लवता त्या मोबाईल कडे टक लावून बसले होते. पालकांनीच मुलांना या सवयी लावल्यातर मोठी झाल्यावर मुले डिमांqडग होतात आणि त्यांना हवा तेव्हा मोबाईल हवाच असतो. मुले शांत बसतात पण त्यांचा संवाद कमी होतो आणि डोळ्यांवरही परिणाम होतोच.

मोबाईलला दूर कसे ठेवावे -

मोबाईलचा आपल्या जगण्यावर होणारा परिणाम काही गोष्टींचे पथ्य पाळून निश्चितच साध्य करता येईल.

घरात आल्यावर फोन अशा जागी ठेवावा की सतत आणि उगाच तो हाताळला जाणार नाही. मोबाईलची रिंग ऑफ करून ठेवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.

क्वचित काही महत्त्वाची गोष्ट किंवा कागदपत्रे किंवा निरोप द्यायचा घ्यायचा असेल तेव्हा आपल्या जोडीदाराला त्याविषयी स्पष्टपणे कल्पना द्या आणि मग ते काम करा. शक्यतो बोलत असताना मध्येच उठून मोबाईल घ्यायला धावत जाऊ नका.

टेक्नोरेफरन्स असेल तेव्हा बचावात्मक पवित्रा घेऊ नका कारण त्याद्वारे एकापेक्षा अनेक व्यक्ती जोडल्या जाणार असतात.

मुलांनी त्रास देऊ नये, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला लागू नयेत यासाठी त्यांना मोबाईल वर गाणी पहायला देणे, गेम खेळायला देणे या चुकीच्या सवयी पालक म्हणून आपणच लावू नये. कारण एकदा मुलांना त्या सवयी लागल्या तर सोडवणे निश्चितच कठीण असते.

 

 

 

             त्याशिवाय घरात मोबाईल वापरण्याचा वेळही मर्यादित ठेवला पाहिजे. समोरा समोर बोलण्याने अनेक गोष्टी स्पष्टपणे कळतात आणि त्यामुळे गैरसमज टळतात. मुलांनाही पालक मोबाईलचा मर्यादित वापर करत असल्याचे चित्र दिसत असल्याने त्यांचेही मोबाईलचे वेड कमी होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon