दर महिन्याला मासिकपाळी का आणि कशी येते जाणून घ्या या व्हिडिओद्वारे (व्हिडीओ)
मासिकपाळी सुरु होणे म्हणजे मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरु होणे. योग्य वयात मासिकपाळी येणे ही सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. जशी एक मुलगी मोठी होत जाते, तिच्यात शरीरात अनेक बदल घडायला लागतात. त्यापैकी एक बदल म्हणजे एन्डोमेट्रिअम व रक्त गर्भाशयातून होणारे उत्सर्जन आणि त्यामुळे दर महिन्याला येणारी मासिक पाळी. मासिकपाळी आल्यावर निरोगी मुलगी ती गरोदर राहून आई बनू शकते.
स्त्रीची प्रजननसंस्था
मासिकपाळी म्हणजे काय जाणून घेण्याआधी सर्वप्रथम स्त्री प्रजननसंस्थेची रचना समजून घेतली पाहिजे.या प्रजनन संस्थेत अनेक अवयव आहेत जसे की –अंडाशय (ovaries), अंडनलिका (fallopian tube), गर्भाशय (uterus), योनिमार्ग (cervix) आणि योनी (vagina). छोट्या बदामाच्या दोन अंडाशये असतात व त्यात हजारो लहान बीजांडे असतात.
मासिकपाळी म्हणजे काय व्हिडिओद्वारे जाणून घेऊ
मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशयाच्या भिंतींवर एन्डोमेट्रियम नावाचा जाड थर तयार होतो. याच वेळी अंडाशयातून एक बीजांड अंडनलिकेतून गर्भाशयात जाते.
ह्या बीजांडाचा शुक्रजंतुशीसंयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते व एन्डोमेट्रियमचा थर गर्भाचे पोषण करतो.
बीजांडांचा शुक्रजंतुशी संयोग झाला नाही तर एन्डोमेट्रियमच्या थराचा उपयोग नसतो. अशा वेळी हा थर व त्यात असलेले रक्त योनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. ह्या प्रक्रियेस मासिक पाळी असे म्हणतात व ही प्रक्रिया ३-७ दिवसात पूर्ण होते.
दोन मासिक पाळीच्या दरम्यान २८ दिवसांचा कालावधी असतो. शारीरिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्याचप्रकारे प्रत्येक मुलीची मासिक पाळी देखील वेगळी असते.
मुलींच्या मासिक पाळीचा कालावधी कमी-जास्त असू शकतो. काही मुलींना १५ दिवसात तर काहींना ३ महिन्याच्या कालांतराने पाळी येते. पाळी नियमित होण्यासाठी काही वेळ लागतो. पहिल्या वर्षांनंतर पाळी नियमित होणे गरजेचे आहे व स्त्राव प्रत्येक महिन्यात सारखे दिवस असला पाहिजे. पाळी साधारण २८ दिवसांच्या कालांतराने येते पण हा कालावधी २०-३५ दिवस असू शकतो.
