Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

सुट्टीत मुलांसाठी घरगुती अभ्यासपूर्ण खेळ

परीक्षांचा हंगाम आला आणि गेला सुद्धा. मुले मस्त मोकळी झाल्याने पालकांची मात्र कसोटी लागते. कारण मुलांना दिवस रिकामा मिळतो आणि तेव्हा काय करायचे हा प्रश्न पडतो. मुळातच शहरी मुलांची एक समस्या आहे ती म्हणजे त्यांना खेळायला फारसे कुणी घरात उपलब्ध नसते. आई वडिल नोकरीव्यवसायाच्या मागे आणि त्रिकोणी कुटुंबात बहिण भावांचीही कमतरता. पुर्वी एकत्र कुटुंबात आपल्या पिढीला कधी हा त्रास जाणवला नसेल. त्यातही हल्ली मोबाईल चे वेड तर बहुतेक सगळ्याच मुलांना लागले आहे. त्यामुळे घरात असले की टीव्ही किंवा मोबाईल या दोन्हींची सवय लागते. त्यामुळेच मुलांना काही वेगळे त्यांच्या विचारक्षमतेला आव्हान देणारे, मैदानी, समूह खेळ आदी प्रकारात काही खेळ खेळायला उद्युक्त करता येईल का याचा विचार पालक म्हणून आपल्याला आता करावा लागेल.

पुर्वी वाड्यात, गल्ली मध्ये अनेक मुले एकत्रच खेळायची ते खेळ व्यायामही चांगलाच घडवायचे. नाही म्हणायला हल्ली उन्हाळी शिबिरे असतात पण तीही फार दिवस नसतात. सुट्टी मात्र तब्बल दोन महिन्यांची असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मग पकडापकडी, लपाछपी, डबडाएैसपैस, विटीदांडू, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, खोखो, खांबा पकडी आदी खेळ खेळले जायचे. हा अर्थात खेळही होता आणि व्यायामही होई. सुट्ट्या उन्हाळ्याच्या दिवसात असल्याने दिवस वर चढेल तसे सावलीत किंवा घरात बसून बैठे खेळ खेळले जायचे. बुद्धीबळ, सापशिडी, व्यापार, लुडो, कोडी घालणे, गोष्टी सांगणे यामुळे मुलांचा बौद्धीक विकासही होत असे.

अर्थात पालकांनी त्यांच्या व्यस्ततेमधून थोडा वेळ काढून मुलांना द्यायला हवा. त्यांना जुन्या खेळांची माहिती द्यायला हवी. त्याचबरोबर काही खेळ खेळायला शिकवता येतील ज्यात शिकताही येईल

घरातले बैठे खेळ-

स्मरण शक्तीचे खेळ-

मुलांना १०-१२ लहान लहान पण वेगवेगळ्या वस्तू आणून ठेवायला सांगाव्या. उदा. पेन, पेन्सील, रुमाल, वाटी, चमचा, बॉल जे मुलांना पटकन हाताशी येतील त्या वस्तू आणायला सांगाव्या. एका ठिकाणी टेबलावर ठेवून त्या लक्षात ठेवायला सांगाव्या. नंतर त्यावर कापड झाकून ठेवावे. मग मुलांना हळू हळू कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते ओळखायला सांगावे. वेळ लागेल. पण त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते.

नाव, गाव, फळ, फूल -

मुलांना पेन्सील आणि ५-६ रकाने केलेला कोरा कागद द्यावा. रकान्यांना नाव,गाव, फळ, फूल, आडनाव, रंग असे नाव द्या. मग एक अक्षर घेऊन त्या अक्षराने सुरु होणाऱ्या या गोष्टी लिहाव्यात. उदा. फ अक्ष़र घेतल्यास त्याचे नाव, गाव, फळ, फूल लिहावे. त्यामुळे मुलांचे सामान्य ज्ञान वाढते शिवाय स्मरणशक्तीला ताण द्यावा लागतो. अगदी लहान मुले असतील तर त्यांना लिहायला न देता सांगायला द्यावे.

ओंजळीने ग्लास भरणे- 

 हा खेळ घरातही खेळता येईल. मात्र त्यात घरात पाणी होणार पण या खेळात मुलांना शारिरीक विकास होतोच परंतू पाण्याचा खेळ असल्याने मुलांना आनंद होतो. यामध्ये अधिक मुले असल्यास दोन गट करावेत. मुलांच्या संख्येइतके ग्लास समान अंतरावर ठेवावे. ठराविक अंतरावर पाण्याने भरलेल्या बादल्या ठेवून मुलांना ओंजळीने त्यांच्या समोरच्या ग्लासात पाणी भरायचे. जो मुलगा सर्वात पहिल्यांदा ग्लास भरेल तो qजकेल. यात मुलांना स्पर्धा कळेल आणि त्यांच्या मोटोर स्कील्स विकसित होतील.

संतुलन राखणे-

यासाठी थोडी जागा अधिक लागते. पण यातही मुलांना खूप मज्जा येते. खेळासाठी रंगीत मास्किंग टेप लागतात. ज्या जागेत खेळायचे तिथे जागा स्वच्छ करून घ्या. मग जमिनीवर मास्किंग टेपच्या सहाय्याने सरळ किंवा वळणावळणाच्या आकारात मास्किंग टेप लावावी. त्यावरून आता मुलांना चालायला सांगायचे. पण त्यात विविध नियम ठेवायचे. जसे हिरव्या पट्टीवरून चालताना हात डोक्यावर ठेवा, निळ्या पट्टीवरून चालताना एका पायाने लंगडी घालत जावे. अशा वेगवेगळ्या रंगांसाठी वेगळे नियम लावावेत. मुलांनी हे नियम पाळत फक्त पट्टीवरून चालायचे आहे. त्याबाहेर गेले की बाद. जे मूल बाहेर पाय न पडू देता संपूर्ण अंतर चालेल तो qजकला.

एकमेकांना हसवणे-

मुलांना खूप कंटाळा आला असेल तर हा खेळ मज्जा आणतो. काही मुलांना समोर उभे करावे आणि काहींना समोर बसवावे. समोर बसलेल्या एका मुलाने येऊन उभे राहिलेल्या मुलांना हसवण्याचा प्रयत्न करायचा पण त्यांना बिलकुल हात लावायचा नाही. विविध नकला, हावभाव, वेगवेगळे आवाज काढून विनोद सांगून हसवायचे. जे हसतील त्यांना खाली बसवायचे आणि जो हसणार नाही तो qजकला.

आवाज ओळखणे -

एखाद्या मुलाचे डोळे बांधावेत किंवा कुणी धरावेत. इतर मुलांनी त्यांचे नाव घेऊन त्याला बोलवावे. मग कोणी हाक मारली ते ओळखावे. अचूक ओळखल्यास १ मार्क द्यावा. सर्व मुलांचे होईपर्यंत हा खेळ खेळावा. सर्वाधिक गुण मिळणारा विजयी होईल.

खोक्यातील वस्तू ओ़ळखा-

एक मोठे खोके घ्यावे. त्यात लहान वस्तू ठेवाव्यात. खोक्याचे तोंड बंद करून एका बाजूने फक्त मुलांचा हात जाईल एवढे मोठे छिद्र पाडावे. मग मुलांना खोक्यातील वस्तू ओळखायला सांगाव्या.

बादलीत चेंडू टाकणे-

एक मोठी बादली घ्यावी. त्यापासून दूर ठराविक अंतरावर मुलांना उभे करावे. मग त्या बादलीत बॉल टाकावा. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्या. एक मूल किती बादलीत अचून बॉल टाकतो आणि बादलीत तो राहतो त्यावरून विजयी कोण ते ठरवावे.

कानगोष्टी-

या खेळात मुलांना गोल करून बसवावे. त्यापैकी एका मुलाला कानात एक वाक्य सांगावे. मग जागेवरून बसून त्या मुलाने पुढच्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. त्याने आपल्या पुढच्या असे करत सर्वांनी सांगून शेवटच्या मुलाने ते वाक्य मोठ्याने सांगावे. मूळ वाक्य आणि शेवटच्या मुलाला सांगितलेले वाक्य खूप बदलले असते.

सापशिडी-

हा खेळ एकावेळी दोन किंवा चार जणं खेळू शकतात. सापशिडीचा तयार कागद मिळतोच. त्यात फासे टाकले की तितकी घरे पुढे जायचे. सापाचे तोंड आले तर पुन्हा खाली आणि शिडी आली तर थेट वरच्या जागेवर. या खेळातली मुले रमून जातात.

काचा कवड्या-

हा देखील ल्युडो सारखाच जुना खेळ आहे. यात कवड्या वापरतात. 

फुली गोळा-

ह्या खेळ्यात मुलेच काय मोठेही रमतात. एका चौकोनात ९ चौकोन करावेत. एकाने फुली तर एका ने गोळा काढायचा. ज्यांचा आडवे, उभे किंवा तिरके तीन गोळे किंवा फुली येईल ते जिंकतात.

त्याशिवाय काही घराबाहेर खेळण्याचे खेळ आहेत.

घराबाहेरील खेळ-

मुलांसमवेत आजूबाजूच्या घरातील मुले असतील तर घराच्या आवारात किंवा इमारतीच्या आवारातही काही खेळ सहजपणे खेळता येतात.

डॉजबॉल-

काही मुलांचा एक गोल करून त्यात काही जणांना पळायला सांगायचे. बाहेरच्या मुलांनी आतल्या मुलांना बॉल मारून आउट करायचे तर आतल्यांनी तो चुकवण्याचा प्रयत्न करायचा. ज्याला बॉल लागला तो बाद होतो. आतले सर्व बाद झाले की गोलावरच्यांनी आत आणि आतल्यांनी गोलावर उभे रहायचे आणि खेळ पुन्हा सुरु करायचा. ज्यांचे जास्त गडी बाद होतील तो संघ हरतो.

लपाछपी-

एकावर राज्य असते आणि बाकीच्यांनी लपायचे. मग प्रत्येकाला शोधायचे. शोधताना कुणी मागून धप्पा दिला तर पुन्हा राज्य घ्यायचे. यात खूप व्यायाम आणि मजा येते.

आंधळी कोशिंबीर-

यातही घराबाहेर मोकळ्या जागी खेळण्याचा हा खेळ. त्यात राज्य असलेल्या गड्याच्या डोळ्यांवर रुमाल बांधायचा. त्याला हात लावणाऱ्या व्यक्तीला त्याने पकडायाचा प्रयत्न करायचा. जो पकडला जाईल मग राज्य त्याच्यावर येते. अर्थात एका वर्तुळात हा खेळ खेळायचा असतो.

विष- अमृत-

एका मोठ्या गोलात सर्वांना पळायला सांगावे. एकावर राज्य असेल तर तो ज्याला हात लावेल तो बसेल त्याला विष मिळाले. दुसऱ्या उभ्या मुलाने त्याला हात लावला तर त्याला अमृत मिळाले. राज्य असलेल्या मुलाने विष दिलेल्या कोणालाही उठू द्यायचे नाही.

वरील काही बैठे आणि मैदानी खेळ मुलांच्या एकाग्रतेसाठी, कौशल्यविकासासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच मोबाईल किंवा टीव्ही चे वेड कमी करण्यासही मदत करतील.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon