Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

लहान मुलांना उष्णतेमुळे होणारे आजार आणि घरगुती उपाय


https://dynamic-cdn.tinystep.in/image/admin-panel-image-5fb455f4-21a9-4cbc-b626-6fa3a8049ca7-1521193653630.jpeg   

फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च ची सुरुवात ही उन्हाळ्याची चाहूल देते आणि पुढे पुढे ऊन अधिक वाढू लागते. लहान मुलांनाही उन्हाळयाचा त्रास होतोच. मुलांना एकीकडे आइस्क्रीम, सरबते, खुणावत असतात पण उन्हाळ्यात होणारे बदल नियोजन न केल्यास या कशाचा आनंद मुलांना घेता येऊ शकत नाही. उलटपक्षी मोठ्यांपेक्षा लहान मुले लवकर उन्हाळ्याच्या त्रासाने त्रस्त होतात. अति उष्ण हवामान, दमट पणा यामुळे मुलांना उन्हाळ्याचा खूप अधिक त्रास होतो त्यांच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण अधिक वाढते. खूप जास्त उष्णता वाढली की मुले काही आजारांना बळी पडतात.

लहान मुलांना अधिक त्रास का

लहान मुले मोठ्यांच्या तुलनेत उन्हाच्या त्रासाला लवकर बळी पडतात कारण मुलांच्या वजनाच्या तुलनेत त्यांच्या अंगात जास्त उष्णता निर्माण होते. लहान मुलांच्या अंगात घर्मग्रंथींचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मुलांना घाम येण्याचे प्रमाण कमी असते. खूप जास्त तापमान असेल तेव्हाच मुलांना घाम येतो. तसेच मोठ्यांच्या तुलनेत बदलत्या वातावरणाचा चटकन् जुळवून घेण्यासाठी लहान मुलांना अधिक वेळ लागतो. शिवाय मुलांना त्यांना तहान लागली आहे किंवा घशाला कोरड पडली आहे हे देखील फार पटकन कळ नाही. तसेच शरीरशक्ती मंदावते. मुलांमध्ये उन्हाळ्यामुळे विविध त्रास होऊ शकतात.

हीट क्र्यांप  (स्नायूंचा स्पाझम)-

मुळात उन्हाळ्यामुळे शरीरातील खनिजे आणि पाणी यांचे प्रमाण कमी होते. मुलांना जरी घाम येत नसला तरीही ते खेळताना त्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे स्नायू दुखण्याची शक्यता असते. पोट दुखणे, पाय, हात दुखणे आदी तक्रारी मुले करतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने तोंडाची चव जाते.

उपाय-

 मुलांना सतत पाणी, सरबते आदी प्यायला द्यावी त्यामुळे शरीरातील आवश्यक खनिजांची पातळी सारखी राहिल. घरामध्ये झटपट ५०० मिलीलीटर पाण्यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकावे आणि हे मिश्रण मुलांना प्यायला द्यावे. मुलांना बरे वाटले की स्नायूंना ताण द्यावा.

चक्कर येणे-

उन्हाळ्यात शरीरातील आवश्यक खनिजे बाहेर पडतात त्यामुळे बाळांना चक्कर आल्यासारखे होते. अति घाम येतो. ओठ आणि जीभ कोरडी पडते.

उपाय 

मुलांना थंड जागी झोपू द्यावे. खोलीत भरपूर ताजी मोकळी हवा येऊ द्यावी. तसेच तोंडावाटे सतत पातळ पदार्थ, पेय पदार्थ द्यावेत जेणेकरून शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहिल. मुलांना घरातच आराम करायला सांगावा. तसेच अधिक प्रमाणात पाणी द्यावे.

शक्तीपात होणे(एक्झॉस्ट होणे)

मुले उन्हात जास्त वेळ घालवत असतील तर मुलांना उष्माघात किंवा शक्तीपात होतो. या त्रासाची काही धोकादायक लक्षणे आहेत. यामध्ये डोकेदुखी, मळमळणे, उलट्या, उभे असताना किंवा बसलेले असताना चक्कर येणे, ताप येणे, अशक्तपणा आणि जीव घाबरा होणे ही त्याची काही लक्षणे आहेत.

उपाय

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावरील उपाय करावेत. मुलांना थंड आणि सावली असलेल्या ठिकाणी ठेवावे. मुलांना ढिले कपडे घालावेत आणि फॅन लावून थंडावा आणावा. मुलांना गार पाण्याने पुसुन काढावे. तसेच मुलांना सतत पेय पदार्थ तसेच मीठ साखर पाणी द्यावे. त्यानंतरही फरक न पडल्यास मात्र डॉक्टरांना दाखवावे.

हीट स्ट्रोक- उष्माघात

मुलांमध्ये उन्हाने होणारा गंभीर त्रास म्हणजे हीट स्ट्रोक. उन्हाळा हा सुट्टीचा काळ असल्याने मुले सतत बाहेर खेळतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात एखाद दिवस हवेत दमटपणा असेल तर मुलांना बाहेर खेळून घाम येत नाही. त्यामुळे मुलांना ग्लानी येणे, मळमळ, उलट्या, अचानक अशक्तपणा, चक्कर येणे, असंबंध बडबड क़रणे, खूप ताप येणे, कोरडी आणि गरम त्वचा ही लक्षणे दिसतात. काही वेळा गंभीर परिस्थिती ओढावल्यास मुले बेशुद्ध होणे, फीटस येणे, श्वसनास त्रास, दम लागणे, नाडीचे ठोके जलद पडणे इत्यादी त्रास होतात.

उपाय

परिस्थिती चे गांभीर्य ओळखून उपचारास सुरुवात करावी. सावलीत मूल ठेवावे. त्याचे कपडे काढून त्याला थंड पाण्याने स्पqजग करुन घ्यावे. कांदा हा प्रकृतीने थंड असतो त्यामुळे पायाला, छातीला कांद्याचा रस लावावा. याचा खूप फायदा होतो. विविध पेये द्यावीत जेणेकरून शरीरातील खनिजे पुन्हा भरून निघतील. मुलाच्या कपाळावर आणि छातीवर चंदन पावडर लावावी. त्यामुळे शरीराचे तापमान घटण्यास मदत होते. त्याशिवाय नारळपाणी द्यावे त्यामुळे मुलांना शक्ती येते.

मात्र मूल बेशुद्ध असेल किंवा गुंगीत असेल तर मात्र कोणतेही पातळ पदार्थ देऊ नका. ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.

या व्यतिरिक्त काही त्रास मुलांना उन्हाळ्यात होत असतात.

संसर्गजन्य आजार

उन्हाळ्यात गोवर, कांजिण्या, गलगंड होणे असे ससंर्गजन्य आजार होतात. लसीकरणामुळे हे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही काही प्रमाणात हे आजार होतात. कांजिण्या, गोवर झाल्यास मुलांना फोड येतात त्याला खाज सुटते. ते खाजवू न देणे यासाठी लक्ष ठेवावे लागते.

उपाय

यामध्ये शरीराचे तापमान वाढते त्यामुळे मुलांना सुती, सैलसर कपडे घालावेत. त्यांनी भरपूर पाणी पाजावे.

डोळ्याचे विकार

आपल्या डोळ्यात एक पातळसा पाण्यासारखा थर असतो त्यामुळे डोळे शांत राहातात. उन्हाळ्यात हा थर उष्णतेने कमी होतो. मुलांनाही हा त्रास होतो. त्यांचे डोळे चिकटणे, लाल होणे असे त्रास होतात.

त्यावर उपाय म्हणजे शक्यतो उन्हात अधिक वेळ न खेळू देणे, उन्हातून आल्यावर थंड पाण्याने हातपाय धुणे, चेहरा धुणे हे करावे.

उन्हाळी लागणे

लघवीला जळजळ होणे म्हणजे उन्हाळी लागणे. हा त्रास बहुतेक सर्व मुलांना उन्हाळ्यात होतो. याचे कारण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे. त्यामुळे लघवी करताना त्रास होतो किंवा जळजळ होते.

उपाय-

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की खनिजांचे प्रमाणही कमी होते. त्यासाठी भाताच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या पाण्यात भिजवून ते पाणी सकाळ संध्याकाळ सेवन करावे. किंवा धणे जिरे रात्री पाण्यात भिजत घालून ते गाळून पाणी दिवसभर प्यावे. शहाळ्याचे पाणी प्यावे. तसेच जशी उन्हाळ्याची तीव्रता वाढते तशी विविध सरबते - लिंबू , कोकम, वाळा यांची प्यावीत. चांगल्या ठिकाणचा उसाचा रस प्यावा.

भूक न लागणे-

मुलांनाच काय मोठ्यांनाही उन्हाळ्यात भूक लागत नाही. कारण उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते. तसेच पाणी कमी झाल्याने शरीर, त्वचा कोरडी पडते. त्यामुळे मुलांना पोट साफ न होण्याचा त्रास होतो.

उपाय 

आहारात तूप, लोणी यांचा समावेश करावा. काळ्या मनुका, अंजिर मुलांना खाण्यास द्याव. रात्री जेवणात हलका आहार घ्यावा. भाताची खिचडी, सुप इत्यादींचा आहारात समावेश करावा.

घोळणा फुटणे

मुले उन्हात खेळतात त्यामुळे उष्ण हवा बाधल्यास नाकाच घोळणा फुटतो आणि नाकातून रक्त येऊ लागते. लहान मुले चटकन घाबरून जातात.

उपाय

डोक्यावर थंड पाण्याचे सपके द्यावे. अडुळशाच्या पानाचा रस अर्धा ते एक चमचा घेऊन त्यात खडीसाखर घालून रोज मुलाना द्यावा. रात्री झोपण्यापुर्वी नाकात साजूक तुपाचे काही थेंब टाकावे त्याने हा त्रास कमी होतो. शिवाय जेष्ठमध आणि मनुका यांचा काढाही फायदेशीर असतो.

त्वचेचे त्रास 

उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, घामोळे येतात.

उपाय -

भरपूर पावडर लावावी आणि आठवड्यातून एक - दोनदा उकडलेल्या कैरीचा गर लावून अंघोळ घालावी त्यामुळे घामोळे कमी होतात शिवाय त्वचा ओलसर आणि मऊ राहते.

त्या व्यतिरिक्त काही गोष्टी जरुर अमलात आणाव्या त्या म्हणजे मुले उन्हातून खेळून घरात आल्यावर त्यांना लगेचच पाणी न देता एक खडा गुळ द्यावा आणि मग पाणी द्यावे. कैरीचे पन्हे, लिंबू, वाळा यांचे सरबत असे पेय पदार्थ आवर्जून द्यावेत.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon