Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

गरोदर असताना पडणारी विचित्र स्वप्ने- त्यांचे करायचे का ?

बाळ होणार ही आनंदाची बातमी समजल्यावर सगळ्या घरालाच आनंद होतो. प्रत्येक जण होणाऱ्या आईच्या काळजी साठी सज्ज असतो. ९ महिन्यांचा काळात अनेक गोष्टी नव्याने कळतात, घडतात आणि काही जाणवणारे बदल होतात.

हे बदल शारिरीक आणि मानसिक दोन्ही पातळीवरचे असतात. त्यासाठी सर्वच प्रकारे तयार रहावे लागते. शारिरीक पातळीवरचे बदल तर प्रत्यक्षात दिसतात, अनुभवता येतात. शारिरीक बदलांमध्ये मोठा महत्त्वाचा बदल असतो तो हार्मोनल चेंजेसचा अर्थात संप्रेरकांमधील बदलाचा. त्याचबरोबर स्वस्थता, झोपेच्या पद्धती, वेळा यांच्यातील बदल यांचाही मानसिक परिणाम होत असतो.

गर्भावस्थेत मनोवस्थेत बदल अचानकपणे होत असतात. गर्भावस्थेतील एक महत्त्वाचा बदल म्हणजे गर्भवतीला पडणारी विचित्र स्वप्नं.

विचित्र स्वप्न पडणे योग्य आहे का ?

गर्भावस्थेत विचित्र स्वप्न पडणे अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे. त्यात वेगळे किंवा चिंताजनक असे काहीच नाही. या स्वप्नांचं वैशिष्ट्य म्हणजे ही अगदी ठळकपणे गर्भवतीला आठवतात. गर्भावस्थेत असताना बहुतांश स्त्रियांना याचा अनुभव येतो. गर्भावस्थेतील प्रगत महिन्यांमध्ये स्त्रियांना शांत झोप लागत नाही. गर्भावस्थेत झोपेत पाहिलेली स्वप्न अगदी ठळकपणे लक्षात राहातात.

स्वप्नांचे प्रकार

झोपेत स्वप्न पडते ते प्रत्येक गर्भवतीला एकसारखेच पडेल असे नाही किंवा नेहमी सारखेच स्वप्न पडते असेही नाही. स्वप्नांमध्ये बदल जरुर होतो.

विचित्र स्वप्न

भीतदायक स्वप्ने

चिंता वाटणारी स्वप्ने

गंभीर स्वप्ने

स्पष्ट आणि स्वच्छ आठवणारी स्वप्ने

स्वप्नांची कारणे 

गर्भारपणाच्या काळात मानसिक, शारिरीक आणि भावनिक या सर्वच पातळ्यांवर बदल होतात आणि या तीनही गोष्टी एकमेकांसी निगडीत असतात. त्यामुळे गर्भारपणात पडणारी स्वप्ने ही का आणि कोणत्या कारणाने पडतात हे वैद्यकशास्त्रासाठी कोडेच आहे. पण तरीही काही शक्यता जरुर वर्तवता येतात.

हार्मोन्समधील बदल

गर्भारपणात काही संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स अधिक स्रवतात तर काही नव्याने स्रवतात. मुळातच संप्रेरकांचा परिणाम स्त्रीच्या भावनांवर होत असतो. चिंता, नैराश्य, दुःख, चिडचिड, रडणे या सर्व भावनांच्या पाठीमागे संप्रेरकांचा मोठा वाटा असतो. त्याचप्रमामे मेंदूच्या क्रियांवरही संप्रेरकांचा परिणाम होतो. मेंदू माहिती आणि भावना यांच्या प्रक्रिया कशा करतो त्यावर गर्भावस्थेत कशी आणि कोणत्या प्रकारची स्वप्ने पडतात हे ठरते.

झोपेमध्ये अडथळा

गर्भावस्थेत शांत झोपेची पद्धत बदलते. नियमित झोपेचे वेळापत्रक पाळणेही अशक्य असते. गर्भावस्थेत शरीराच्या वाढत्या वजनामुळे आणि आकारामुळे स्वस्थता नसते, गर्भाशयातील बाळाच्या हालचाली किंवा लघवीला जावे लागणे यामुळे गाढ झोप लागत नाही. झोपेचे काही टप्पे असतात त्यातील आरएमई म्हणजे रॅपिड आय मुव्हमेंट झोपेच्या काळात स्वप्न पडतात. झोपेत अडथळा येत असेल तर मात्र झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. कधी कधी विचित्र स्वप्नही पडतात.

स्वविचारांचे प्रतिबिंब

झोपेत पडणाऱ्या या स्वप्नांमध्ये स्त्रीचे स्वतःच्या काही विचारांचे प्रतिqबबही असू शकते. काहींच्या बाबतील गर्भारपण, बाळंतपण आणि पालकत्वाविषयी विचार, ताण, चिंता यांचाही प्रभाव या स्वप्नांवर पडलेला दिसतो. दिवसभर काही चिंता किंवा विचार सतावत असतील तर झोपल्यानंतर स्वप्नांच्या माध्यमातून ते पुन्हा आपल्याला दिसतात. आपल्या अंतर्मनातील काही भावना स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. काही वेळा बाळ झाले आहे आणि त्याला नीट दूध पाजता येत नाही, त्याला सांभाळता येत नाही अशा प्रकारची स्वप्ने पडतात. अनेकदा लहानपणातील काही प्रसंगही स्वप्न रुपाने पुन्हा पुन्हा पडत राहातात. या सगळ्यांमधून पालकत्व निभावण्याविषयी, बाळाची काळजी घेण्याविषयीच्या सुप्त मनातील चिंता स्वप्नांच्या रुपाने समोर दिसतात. काही स्त्रियांना वरून खाली पडणे, कशापासून तरी पळणे किंवा एखाद्या ठिकाणी अडकून पडलो आहोत अशी स्वप्ने पडतात. काही वेळा पती-पत्नी नात्यासंदर्भातही स्वप्ने पडतात.

स्वप्नांचे करायचे काय

मुळातच अपुऱ्या किंवा अशांत झोपेमुळे स्वप्न पडतात. पडणारी स्वप्नं सहन करण्यासारखी असतील तर झोपेची जागा, स्थिती बदलून पहा. शांत झोप लागली तर कदाचित स्वप्न पडणारही नाहीत. त्यामुळे शांत झोपेसाठी प्रयत्न करावे. काही वेळा भीतीदायक स्वप्न पडत असेल तर कुणाला तरी ते सांगून मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करा किंवा ते स्वप्न लिहून काढा जेणेकरून सुप्त मनात त्याविषयीचे विचार राहाणार नाहीत ते बाहेर पडतील आणि चिंता कमी होईल.

गर्भारपणातील स्वप्ने ही त्रासदायक नसतात. पण तरीही खूप त्रासदायक स्वप्न पडत असतील तर मात्र समुपदेशक किंवा थेरपिस्ट ला ती सांगावीत. कदाचित सुप्त मनातील एखादी दुखरी भावना प्रबळ असल्याने भीतीदायक स्वप्न वारंवार पडत असतील. समुपदेशक किंवा थेरपिस्ट शी संवाद साधल्यास स्वप्नांची तीव्रता जास्त जाणवणार नाही. कोणत्या भावनांचे व्यवस्थापन करायला पाहिजे याचाही अंदाज त्यामुळे येईल.

एकुणात गर्भारपणातील स्वप्ने भीतीदायकच असतील असेही नाही तर ती रंजकही असू शकतात. काही वेळा गर्भवतीच्या बालपणीच्या रंजक आठवणीही पुन्हा स्वप्नरुपात दिसू शकतात. या स्वप्नांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र गर्भावस्थेत स्वप्न पडणे ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे एवढी खूणगाठ मनाशी पक्की असू द्या.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon