Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

दोन तान्ह्या बाळांच्या आईंची ऑनलाईन संभाषण !


माझ्या मैत्रिणींच्या मुलीने, प्रियाने फेसबुकवर बाळाचा फोटो टाकला. मस्त हसरा! सहा महिन्याचं बाळ आईच्या हाताला आधार करून मांडीत पाय रोऊन उभे. आईचा चेहरा नव्हता आला फोटोत. मी लगेच फोटो ‘लाइक’ करून कमेंट दिली – ‘‘वा किती छान वाटतोय गं वृषभ.’’ तिचं लगेच उत्तर – ‘‘वाटतोय ना छान- पण ती माझ्या मैत्रिणीची सोनाली आहे. घेतल्यावर छान पोटावर उभी राहते. वृषभ पायच टेकायला बघत नाही. माझी मैत्रीण म्हणते, वृषभचं मालीश चांगलं झालं नाही. त्याचे पाय थोडे वाकडे वाटतात. मावशी तूच म्हणालीस होतीस नं कॅल्शियम सिरप नको, आता बघं कॅल्शियम कमी पडलं असेल का? तो सोनालीपेक्षाही वीस दिवस मोठा आहे, मग असं कसं?

बापरे अस्सं होतं तर! तिचा सहा महिन्यांचा वृषभ ज्याची वाढ उत्तम झाली होती. सहा महिन्यांपर्यंत केवळ आईच्या दुधावर होता (अनेक अडी-अडचणींनी तोंड देत अर्थात) व त्याला प्रियाने स्तनपानाबरोबरच नाचणीची खीर, खिचडी वगैरे सुरू केले होते. तो म्हणे अजून पाय रोवत नव्हता. कारण मी प्रियाला कॅल्शियम सिरप नको देऊ म्हणाले नं!

बाळाचं वजन जन्मत: अडीच किलोपेक्षा जास्त असेल, त्याला सहा महिने केवळ मातेचं दूध मिळालं असेल आणि सहा महिन्यांनंतर मातेच्या दुधाबरोबरच वरचा घरगुती आहार दिला तर कोणत्याही टॉनिकची गरज नाही.

तसंच आहे टाळू भरायचं! बाळाला आंघोळ घालताना टाळू भरावी का? मुळीच गरज नाही. किंचित कोमट खोबरेल तेलाची हळुवार मालीश हाता-पायांना झाली तरी बस. वेगळ्या बालतेलाचीही गरज नाही. टाळू तेलाने थापला नाही तरी पुढचा टाळू दीड वर्षांत व मागचा तीन वर्षांत आपसूकच भरून येतो. आंघोळीआधी तेल लावले तर ते सौम्य साबणाने धुऊन टाकले पाहिजे. आंघोळीसाठी डाळीचे पीठ, साय वगैरे वापरू नये.

माझी भाची नुकतंच म्हणाली, ‘तो एक वर्षांचा होईल, आत्या त्याचे पाय वाकडे वाटतात का बघा नं?’

 

सर्वच बाळांचे पाय किंचित वाकलेले असतात. नवजात बाळाला कपडय़ात गुंडाळताना (बांधताना नव्हे) बाळाचे पाय दाबून सरळ करण्याची गरज नाही. बाळ चालू लागले म्हणजे पाय आपोआप सरळ होतात. नुकतंच बसायला शिकलेली बाळं, स्वत:ला बॅलन्स करण्यासाठी किंचित पुढे झुकतात. याचा अर्थ तो कुबड काढून बसतो असा नव्हे.

दोरा-कडदोरा सैलसर असेल तर चालेल, पण मानेभोवती दोरा वगैरे बांधू नये. घोटय़ाला किंवा दंडाला चालेल.

नॅपिरेश – हा बाळांचा नवा आजार आहे. कोरडी सुती लंगोटी घातली तर कशाला होईल रॅश.

माझं बाळ नेहमी शिंकतं सर्दी असेल का? नवजात बाळाचं नाक चिमुकलं असतं. दोन-तीन वेळा शिंक येतेच. नंतरही बाळ शिंकत असेल (शेंबडाशिवाय) तर सर्दी म्हणून उपचार देऊ नयेत.

काही बाळं झोपल्यावर श्वास घेताना आवाज येतो. बाळाची छाती भरली म्हणून आई लगेच घाबरते.

बाळ आजारी पडल्याचं पहिलं लक्षण आहे बाळ अंगावर प्यायला मागत नाही.

तान्ह्य़ा बाळांना उचकी येणं स्वाभाविक आहे. ती तोंड उघडं ठेवतात. त्यामुळं घसा सुकतो व उचकी लागते. अंगावर प्यायल्यावर उचकी थांबते.

बाळाच्या इतर गोष्टींबरोबरच आईला त्याच्या शी-शूची धास्ती वाटते.

बाळाची पहिली शू जन्मल्यावर ४८ तासांत कधीही होते. कारण जन्मत: किंवा बाळ ‘ओलं’ असताना एकदा झालेली असते. बाळाला जन्मत: केवळ चीक दूधच मिळते. यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप कमी असते, म्हणून शू लवकर होत नाही. पहिले सात-आठ दिवस बाळ वारंवार शू करीत नाही. पण एकदा का स्तनपान, प्रस्थापित झालं की बाळं चोवीस तासांत सहा-सात वेळा शू करतात.

शी’चंही तसंच जन्मल्यावर चोवीस तासांत काळी शी होते आणि तीन दिवस सतत होत राहते. त्यानंतर अंगावर पिणाऱ्या बाळांना पिवळी सोनेरी शी होऊ लागते. प्रत्येक बाळ ही स्वतंत्र व्यक्ती आहे. दिवसातून तीन-चार वेळा, आठ-दहा वेळा किंवा चार-आठ दिवसांतून एकदा शी होऊ शकते. दोन्हीमध्ये काळजीचे कारण, उपचाराची गरज नाही.

बोटं चोखणं- सर्वच बाळ हाता-पायाची बोटं तोंडात घालून चोखतात. पण याचा अर्थ बाळाला भूक लागली आहे असंच नव्हे.

काही बाळं संध्याकाळी किंवा रात्री रडतात. काही मिनिटं किंवा तास हे रडणं चालू शकतं. त्याची निश्चित कारणं देता येत नाहीत. बाळाला कुशीत घेऊन जोजवणं, थोपटणं, हाच उपाय. बाळ तीन महिन्याचं झालं की ही समस्या कमी होते.

वॉकर किंवा पांगुळगाडा – दहा-अकरा महिन्याचं बाळ होईपर्यंत वॉकरमध्ये घालू नये. त्यानंतर घातलं तर बाळ आपोआप मजेने चालायला शिकतं. पांगुळगाडय़ाने बाळ पडण्याची शक्यता असते.

बाळ मोठं झाल्यावर आपण उगीच काळजी केली म्हणून उमजतं पण प्रत्येक मातेला काळजी चुकत नाही. शिकलेली असेल तरीही डॉक्टर असेल तरीही.

                                                         साभार - लोकसत्ता 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon