Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

धावपळीच्या आयुष्यात या सोप्प्या गोष्टी पाळा आणि स्वतःला फिट ठेवा

धावपळीचे आयुष्य आणि निरोगी आरोग्य, योग्य आहार ही अंधश्रद्धा झालीय जणू हल्ली. कारण जो तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमागे पळत असतो आणि नसतो तो वेळ. अर्थात धावपळ किंवा व्यग्र जीवनशैली आणि आरोग्य यांचा ताळमेळ अवश्य बसवता येतो होय एकत्रितपणे या दोन्ही गोष्टींचा मेळ घालता येतो. अर्थात ही गोष्ट काही एका रात्रीत जमणारी नाही तर त्यासाठी थोडा काळ जावा लागेल आणि मुख्य म्हणजे स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील. काही गोष्टी टाळाव्या लागतील तर काही नव्याने स्वीकाराव्या लागतील. पण बदल हा निसर्गाचा नियमच आहे त्यामुळे व्यग्र किंवा धावपळीचे आयुष्य आणि तंदुरुस्ती किंवा आरोग्य हे समीकरण नक्कीच साध्य करता येईल.

अर्थात हे सर्व करु म्हणणारे लोक त्यातूनही पळवाटा शोधतील आणि सर्वात मोठी पळवाट म्हणजे मी विसरलो किंवा मी विसरले. त्यानंतर कामात खूपच व्यग्र होते, ऑफिसला उशीर झाला, वेळ कमी त्यामुळे इन्स्टंट एनर्जी किंवा शक्ती देणारे पदार्थ खावे लागले. हे सर्व बहाणे आता बाजूला ठेवा. उत्तम आरोग्य तंदुरुस्त आयुष्य जगण्याची पहिले काम करावे लागेल ते म्हणजे कारणे द्यायची नाहीत आणि थेट कामाला लागायचे तरच कामकाजी किंवा व्यग्र राहूनही आरोग्याची किल्ली आपल्या हातात ठेवता येईल.

मुळातच आपल्याला सर्वच गोष्टी करण्याची घाई असते आणि ही घाईच तणाव वाढवते. घर किंवा ऑफिस सगळीकडे हीच घाई असते त्यामुळे चीडचीड, तणाव, एकाग्रता नसणे, निर्णय अक्षमता या सर्व गोष्टी होऊ लागतात पर्यायाने त्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यात आणि नोकरीवरही होतोच. त्यामुळे निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. काही गोष्टी नियमितपणे पाळल्या पाहिजेत.

पुरेसे पाणी-

कामात व्यग्र असल्यानंतर शब्दशः तहान भूक सर्वच हरवते. त्यामुळे पाणी पिण्याकडेही दुर्लक्ष होते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर अशक्तपणा येतो. शिवाय उष्णताही वाढते. हल्ली बहुतेक ऑफिसेस ही वातानुकुलित यंत्रणा बसवलेली असतात त्यामुळे उन्हाळ्यातही ऑफिसमध्ये गेल्यावर तहान लागत नाही किंवा पाण्याची गरज लागत नाही. पण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. हल्ली स्मार्टफोन्स मध्ये पाणी प्यायची आठवण करून देणारी अ‍ॅप्स डाऊनलोड करता येतात. त्यातील एक चक्क डाऊनलोड करा जेणेकरून हे अ‍ॅप पाणी पिण्याची आठवण करुन देईल. किंवा मोबाईलमधील रिमांडर सेवा वापरता येते. सर्वच कॉर्पोरेट लोक ही सुविधा न चुकता वापरत असतात त्यामुळे पाणी प्यायचा रिमांडर वाजल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता पाणी प्यावे. जेणेकरून विसरूनच गेलो, व्यग्र होते ही कारणेही देता येणार नाहीत.

पुरेशी झोप-

ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी शरीराची शक्ती, उर्जा योग्य प्रमाणात राखते. हल्ली अनिद्रा, अपुरी झोप हे अगदी परवलीचे शब्द डॉक्टरांना ऐकावे लागतात. त्याचेही कारण वेळेची कमतरता. झोपेचा वेळ कमी करुन काम करत राहाणे. अगदी सोपे आहे शरीर जर एक यंत्र आहे असे समजले तर कधी तरी त्या यंत्राची बॅटरी, क्षमता संपत असेल जसा मोबाईलची बॅटरी संपते. तसेच शरीराचेही आहे त्याची क्षमता कमी होते ती भरून निघते ती झोपेच्या काळातच. शरीराला आराम मिळाला तर शरीराची सर्वच कार्ये व्यवस्थित सुरु राहतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची बहाणेबाजी न करता झोपेच्या वेळा पाळाव्या आणि किमान ८ तास झोपावे.

विचारपूर्वक घ्या आहार-

नास्ता स्कीप करूया आणि कामाला लागूया किंवा ऑफिसला जायला उशीर होतो म्हणून न्याहारी न क़रणे ही अत्यंत चुकीची सवय आणि मानसिकता आहे. हल्लीचे व्यावसायिक लोक नास्ता टाळून शरीरावर अन्याय करतात. वास्तविक नाश्ता किंवा न्याहारी किंवा ब्रेकफास्ट हा दिवसातील पहिला आहार असतो. रात्री जेवून झोपल्यानंतर ७-८ तासांच्या गॅपनंतर सकाळी उठल्यावर न्याहारी करणे आवश्यक आहे कारण तब्बल ८ तास पोटाला उपवास घडलेला असतो. त्यामुळे नास्ता हा शरीरासाठी उर्जा देणारे इंधन असते. जेव्हा नास्ता करत नाही तेव्हा पोटात तयार झालेले पचनासाठीचे आम्लाची तीव्रता वाढते त्यामुळे पोटाच्या तक्रारी सुरु होतात. तसेच स्थूलपणाही वाढीस लागतो.

तसेच कामाच्या वेळा वाढलेल्या असल्याने प्रक्रियायुक्त पदार्थ, अतिगोड, मसालेदार, तळलेले पदार्थ खाल्ले जातात. पण त्याचा आरोग्याला काहीच फायदा नसतो. पण हे सर्व पदार्थ आवडीचे असल्याने संपूर्ण सोडण्याचीही गरज नाही मात्र त्याचे प्रमाण नक्कीच मर्यादित असले पाहिजे. तेवढे स्वनियंत्रण असलेच पाहिजे. न्याहारी तर घेतलीच पाहिजे शिवाय सतत काही ना काही वेफर्स, चॉकलेट सारखे पदार्थ तोंडात टाकण्याच्या सवयीवरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्याऐवजी सुकामेवा, फळे, फळांचा रस, सलाड असे पदार्थ जरुर खावेत.

व्यायाम-

पुर्वी बहुतेकांच्या घरात सकाळी उठले की किमान सूर्यनमस्कार, दंड, बैठका घातल्या जायच्या. हल्लीच्या काळात मोठ मोठ्या जिमचे सदस्यत्व घेऊनही तिथे जाणे होत नाही. थोडक्यात काय सकाळी उठून ऑफिसला जाणे एवढेच आयुष्य नाही तर सकाळी उठून धावणे, पळणे, चालणे आदी व्यायाम जरुर केले पाहिजेत. मोकळ्या हवेत जाऊन व्यायाम केल्याने उत्साह द्विगुणीत होतो. त्याचा परिणाम आपल्या मनावर, शरीरावर आणि मेंदूवरही होतो. एकाग्रता वाढते आणि चयापचय क्रियाही व्यवस्थित होते.

चहा, कॉफी-

कामाच्या ताणामध्ये किती चहा आणि कॉफी प्यायली जाते याची काही गणतीच राहत नाही. पुन्हा वेळ नाही म्हणून जेवणाच्या वेळीही चहा कॉफीचेच सेवन केले जाते. त्यामुळे शरीरात टॅनिन आणि कॅफिनचे प्रमाण खूप अधिक वाढते. अर्थात ही सवय काही लगेच कमी होणार नाही पण दिवसभरातील चहा कॉफीचे प्रमाण एक ते दोन कप इतकेच मर्यादित ठेवा. तसेच साखर आणि साय घालणे बंद करा. त्यामुळे शरीरात विनाकारण उष्मांक जाणार नाहीत.

मद्यपान आणि धूम्रपान-

खूप तणाव आला म्हणून किंवा इच्छा झाली म्हणून किंवा कामात विरंगुळा म्हणून सिगरेटचे झुरके मारले जातात. सुरुवात एका पासून होत मग ते वाढतच जाते. तीच परिस्थिती मद्यपानाची. कामाचा ताण विसरायचा म्हणून सुरुवात होते आणि मग व्यसन लागते. ह्या दोन्ही गोष्टी अर्थातच अहितकारक आहेत. याचा मोह होणार पण कमी करण्यापेक्षाही ते टाळलेलेच बरे.

शरीराची ठेवण

ऑ़फिसमध्ये अनेक तास बसून काम करताना पाठदुखी, कंबरदुखी, डोळे दुखणे याने त्रस्त असतात. सातत्याने अनेक तास कॉम्प्युटरवर काम करण्याची बैठी जीवनशैली आरोग्यासाठी मारक आहे. काही वेळा बसण्याची अयोग्य पद्धतही दुखणे ठरते. त्यासाठी कॉम्प्युटर वर टेबलवर बसल्या बसल्या करण्याचे काही व्यायाम आणि डोळ्यांचे व्यायाम करावेत. तसेच अधून मधून उठून चालावे. त्यामुळे पाठीवर, मानेवर ताण येत नाही. अनेकदा अगदी पाणी प्यायला उठायचाही कंटाळा केला जातो का तर वेळ वाया जातो. मात्र दीर्घकालीन काम करण्यासाठी या गोष्टी करणे उपयुक्त आहे. कामाच्या ठिकाणापासून बाजूला जाऊन चालावे त्यामुळे तरतरी येते आणि पुन्हा काम क़रण्यास उत्साह येतो.

कामाच्या जागी स्वच्छता

कामाची जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्यास मन प्रसन्न वाटते. सकाळी पुन्हा कामावर आल्यावर स्वच्छ नीटनेटका टेबल पाहून आपल्याला प्रसन्न वाटते, उत्साही वाटते. टेबलावर हात धुण्यासाठी सॅनिटायझरची बाटली ठेवा. कारण प्रत्येक वेळी हात स्वच्छ करण्यासाठी उठून जाता येत नाही. तसेच सर्दी, खोकला असा त्रास असताना हात धुणे सोयीचे जाते.

तणावाचे व्यवस्थापन-

खूप काही मिळवायचे असते त्यासाठीच आपण कामही करतो. मात्र तणाव किंवा ताण आला की सारेच चक्र बिघडते. ताण शारिरीक, मानसिक दोन्ही परिणाम करतो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन ही गोष्ट कार्यबाहुल्य असणाèया लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाèया निभावताना उर्जाविरहीत शरीर असल्याचे वाटणेही अगदी साहाजिकच आहे. कारण प्रत्येक व्यक्तीची एक क्षमता असते. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करता आले तर आयुष्य अधिक सुकर होईल. आवडता छंद जोपासा, गाणी ऐका, कुटुंब आणि मित्र यांच्यासमवेत वेळ घालवा. ज्या गोष्टी केल्याने मनाला आराम आणि आनंद मिळेल ती कोणतीही गोष्ट करण्यासाठी आवर्जून वेळ काढा

या काही गोष्टी केल्या तर कार्यबहुल लोकांचे आरोग्यही तंदुरुस्त राहाण्यास मदत होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon