Link copied!
Sign in / Sign up
48
Shares

एगलेस आणि इतर केकच्या रेसिपी

 


 

केक हा मुलांच्या काय तर मोठ्यांचाही आवडीचा विषय आहे. क्रीमचा केक तर वाढदिवसाला असलाच पाहिजे असा मुलांचा हट्टच असतो. इतर वेळीही विविध प्रकारचे केक खाणे मुलांना आवडतेच. केक चे विविध प्रकार असले तरीही त्यात महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी केक. थोडक्यात सांगायचे तर अंड्याचा केक आणि बिन अंड्याचा केक.

अंडे शाकाहारी की मांसाहारी हा मुद्दा काही काळ बाजूला ठेवूया. पण काही व्यक्ती अंडे घातलेला केक बिलकूल खात नाहीत. त्यांना शाकाहारी म्हणजे बिनअंड्याचा केक हवा असतो. केकच्या दुकानात सहसा बिनअंड्याच्या केक मध्ये विविध प्रकार मिळत नव्हते पण आता तेही मिळू लागले आहेत. अंड्याशिवाय केक तयार होऊ शकत नाही ह्या समजाला तडा देण्याचे काम बिनअंड्याच्या केकच्या विविध प्रकारांनी केले आहे. अगदी उत्तम प्रकारचे अंडेविरहीत केक तयार केले जाऊ शकतात. अर्थात त्याला सरावही लागणारच.

दुकानात कितीही प्रकारचे केक उपलब्ध असले तरीही घरी केक बनवून तो चट्टामट्टा करण्याची मजा काही औरच असते. मुलांनाही घरी केलेला केक नक्कीच आवडतो आणि तो भरपूर खाताही येतो.

आपण केकच्या रेसिपी पाहूया त्यातील काही अंड्यासह असतील तर काही बिन अंड्याचे असतील.

बिनअंड्याचे केकच्या रेसिपीज

अंडेविरहीत खजूर आणि अक्रोड केक

साहित्य

पाऊण कप मैदा

अर्धा कप खजुराचे तुकडे

पाव कप पाणी खजूर भिजवण्यासाठी

पाव कप अक्रोडचे तुकडे

पाऊण कप कन्डेन्स्ड मिल्क

४ टेबलस्पून लोणी किंवा अनसॉल्टेड बटर वितळवून घेणे

१ टेबल स्पून बेकिंग सोडा

अर्धा चमचा बेकिंग पावडर

अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स

कृती-

१ खजूराची बी काढून त्याचे तुकडे पाव कप पाण्यात अर्धा तास भिजत घालावेत. ते पाण्यातून काढून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पेस्ट बारीक होण्यासाठी भिजवलेले पाणी वापरावे.

२ केकसाठी ओव्हन तयार करावा लागेल. तो १६० अंश सेल्सिअस वर गरम करण्यास ठेवा.

३. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून २-३ वेळा चाळून घ्या. त्यामुळे गुठळी राहाणार नाही आणि सर्व एकत्र मिक्स होईल. दुसऱ्यावाडग्यात कन्डेन्स्ड मिल्क, पातळ केलेले लोणी आणि व्हॅनिला इसेन्स घाला. त्यात मैद्याचे मिश्रण हळूहळू घालावे सतत हलवत रहावे जेणेकरून गुठळी होणार नाही. मग त्यात खजूराची पेस्ट, अक्रोडचे तुकडे घालून मिसळावे.

४. ओव्हनमध्ये वापरण्याचे केकचे भांडे घ्यावे. त्याला बटर लावून त्यावर पिठीसाखर किंवा मैदा भुरभुरावा म्हणजे केक भांड्याला चिकटणार नाही. केकसाठीचे मिश्रण भाड्यात ओतावे. एक जाड कापड ठेवून हे भांडे थोडे आपटून घ्यावे. आता प्रीहीट ओव्हनमध्ये रॅकवर केकचे भांडे ठेवावे. ४५ मिनिटे केक बेक करावा.

५. ४५ मिनिटांनी ओव्हन बंद करावा. पाच मिनिटे भांडे तसेच ठेवून मग बाहेर काढावे.

६. भांडे गार झाल्यावर त्यावर एक ताट ठेवून भांडे उलटवून केक काढून घ्या.

७ केक पूर्ण गार होऊ द्या. कापण्यापुर्वी केक गार झाला पाहिजे. लहान तुकडे करून खायला द्या.

मँगो केक

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. घराघरात आंब्याने प्रवेश मिळवला आहे. रोज आंब्याचा रस, चोखून आणि कापून आंबे खाणे सुरुच आहे. त्याच आंबा आईस्क्रीम हे देखील आहेच. मग केक का बरे नको. म्हणून ही आंब्याच्या केकची रेसिपी शिकूया.

साहित्य-

१ कप आंब्याचा पल्प

१ कप मैदा

अर्धा कप कडेन्स्ड मिल्क

अर्धा कप पीठीसाखर

अर्धा कप लोणी

थोडे दूध

बदामाचे काप २ चमचे, काजू चे काप १ चमचा, किसमिस १ मोठा चमचा.

एक चहाचा चमचा बेकिंग पावडर

पाव चमचा बेकिंग सोडा

कृती-

सर्वात पहिल्यांदा एका बाऊल मध्ये आंब्याचा पल्प घेऊन त्यात लोणी, कन्डेन्स्ड मिल्क घालून चांगले फेटावे. त्यात अर्धा कप पीठीसाखर घालावी. पुन्हा फेटून घ्यावे. दुसऱ्याएका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून दोन वेळा चाळून घ्या. आंब्याच्या पल्पच्या मिश्रणात मैद्याचे हे मिश्रण घालून ते एकत्र करावे. चांगल्या प्रकारे फेटून घ्या. या मिश्रणात गुठळ्या नाही व्हायला पाहिजेत. त्यासाठी व्यवस्थित मिश्रण फेटून घ्या.

ओव्हन १८० अंशावर गरम करायला ठेवावा.

केक करण्याच्या भांड्याला आतून लोणी लावावे. त्यावर कागद लावावा आणि त्यावरही लोण्याचा हात फिरवावा.

आता केकच्या मिश्रणात दुध मिसळावे आणि पुन्हा फेटून घ्यावे. आता यामध्ये कापलेले बदाम, काजू आणि किसमिस घालावे. केकचे मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ व्हायला नको. अन्यथा केक हलका सछिद्र होत नाही.

लोणी लावून तयार केलेल्या भांड्यात हे मिश्रण घालावे आणि भांडे थोडे आपटावे त्यामुळे त्यातील हवा निघून जाते.

गरम झालेल्या ओव्हनमध्ये हे भांडे २५ मिनिटांपर्यंत बेक करण्यासाठी ठेवावे. २५ मिनिटांनंतर केकचे भांडे बाहेर काढून पहावे. केकचा वरचा भाग सोनेरी तपकीरी रंगाचा झाला पाहिजे. तसा झाला नसेल तर अजून १० मिनिटे केक बेक करुन घ्या.

केकमध्ये टुथपिक घालून पहा जर केक टुथपिकला चिकटला नाही तर केक तयार आहे. नसल्यास पाच मिनिटे बेक करावा. केक झाल्यावर ओव्हन बंद करावा आणि केक पाच मिनिटे तसाच ठेवावा. केक थंड झाला की काढून घ्यावा.

मॅगो केक तयार आहे. सव्र्ह करता त्यावर आंबा घालून फेटलेली साय किंवा क्रीम घालू शकता तसेच आंब्याचे तुकड्यांनी सजवूनही देऊ शकता.

आता दोन अंड्याच्या केकच्या रेसिपी पाहूयात. या देखील अत्यंत सोप्या आहेत.

साधा अंड्याचा केक

साहित्य-

१ कप लोणी

सव्वा कप साखर

दीड कप मैदा

१ टीस्पून बेकिंग पावडर

४ अंडी

१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स

कृती-

एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर दोन वेळा चाळून घ्या.

दुसऱ्याबाऊलमध्ये साखर आणि लोणी फेसून घ्या. त्यात एका वेळेला एक अशी चारही अंडी फोडून घाला. प्रत्येक अंडे घातल्यानंतर फेटत रहावे. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घाला पुन्हा चांगले फेसून घ्या.

ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस वर गरम करा.

आत अंड्याच्या मिश्रणात एकेक चमचा मैदा घालत फेटून घ्या. सर्व मैद्याचे मिश्रण घालून चांगले फेटा.

ज्या भांड्यात केक करायचा त्याला लोणी लावून घ्या. त्यावर पीठीसाखर किंवा मैदा भुरभुरावा. भांडे उलटे करून जास्तीची पीठीसाखर किंवा मैदा काढून टाकावा. आता केकच्या भांड्यात हे सर्व मिश्रण घालावे. भांडे थोडे आपटून गरम केलेल्या ओव्हनमध्ये ४० मिनिटे ठेवून बेक करावे. मग टुथपिक किंवा सुरी केकमध्ये घालून पहावी. ती स्वच्छ बाहेर आल्यास केक तयार आहे असे समजावे.

हा साधा केक आपण कुकरमध्ये मीठ घालून कुकरची शिटी काढून ठेवून किंवा भांड्यात तळाला मीठ किंवा वाळू घालून झाकण लावून ४५ मिनिटात करु शकतो.

चॉकलेट एग केक

साहित्य

१ कप मैदा

१ कप पीठीसाखर

अर्धा कप कोको पावडर

१ चमचा बेकिंग पावडर

१ चमचा बेकिंग सोडा

अर्धा चमचा कॉफी पावडर

अर्धा कप रिफार्इंड तेल

अर्धा कप गरम पाणी

अर्धा कप गार दूध

एक चमचा व्हॅनिला इसेन्स

१ अंडे फेटून

कृती-

ओव्हन १८० अंश सेल्सिअस वर गरम करावा. केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून घ्यावा.

एका बाऊलमध्ये सराव कोरडे जिन्नस एकत्र करावे. मैदा, पीठीसाखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि कॉफी पावडर. हे सर्व एकत्र करून बाजूला ठेवा.

दुसऱ्या एका बाऊलमध्ये अर्धा कप तेल आणि अर्धा कप गरम पाणी चांगले मिश्र करुन घ्या. ते थोडे गार होऊ द्या. गार झाल्यावर त्यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स टाकावे. नंतर फेटलेले १ अंडे टाकावे. आता या मिश्रणात मैद्याचे मिश्रण हळू हळू टाकावे फेटत रहावे. सर्व चांगले फेटून एकत्र व्हायला पाहिजे म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत. हे मिश्रण तेल लावलेल्या केकच्या भांड्यात ओतावे. मग ओव्हनमध्ये १८० अंशावर ३५ ते ४० मिनिटे बेक करुन घ्यावे. ४० मिनिटांनी केकमध्ये टुथपिक टोचावी ती स्वच्छ बाहेर आली की केक झाला आहे नसल्यास अजून पाच मिनिटे ठेवावे.

मग गार झाल्यावर बाजूने सुरी फिरवून केक काढून घ्यावा. गार झाल्यावर चॉकलेट सॉस घालू शकता किंवा तसाही खाऊ शकता.

मग मुलांच्या सुट्टीत घरी करून पहा हे केक. मुलेच काय मोठेही खूष होतील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon