Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

ब्रेडच्या पाककृती भाग २

काल आपण काही ब्रेडच्या पाककृती पहिल्या आणि आज अजून काही पाक कृती पाहणार आहोत या तुम्हांला या रेसिपी नक्कीच आवडतील 

ब्रेडचे गुलाबजाम

खव्याचे गुलामजाम आपण करतोच मात्र ब्रेडचेही गुलाबजाम उत्तम लागतात. त्यासाठी ब्रेड दुधात भिजवावा. खव्यात साखर, वेलदोडा पूड मिसळावी. पाच मिनिटांनंतर ब्रेड पिळून एका ताटात काढावा. त्यात मैदा आणि रवा मिसळून त्याचे मिश्रण तयार करावे. आता या मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे करावेत. गुलाबजामच्या मध्ये खव्याच्या मिश्रणाचा गोळा ठेवावा गोळा बंद करावा. कढईत तेल गरम करून गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. एक तारी पाक बनवून गुलाबजाम २-३ तास पाकात ठेवावेत. गुलाबजाम तयार.

ब्रेड पिझ्झा

मुलांना पिझ्झा खूप आवडतो. घरच्या घरी ब्रेडचा जरा पोषक पिझ्झा आपण बनवू शकतो. ब्रेडच्या कटा काढून टाकाव्यात. उकडलेल्या मक्याचे दाणे, भाज्या बारीक कापून त्यात मीठ, तिखट टाकून एकत्र मिश्रण करावे. ब्रेडला लोणी लावून त्यावर सॉस लावून भाज्यांचे मिश्रण त्यावर पसरावे. त्यावर पनीर खिसून घालावे. त्यावर चाट मसाला आणि सर्वात वरती चीझ किसून घालावे. आता ब्रेड ओव्हनमध्ये ठेवून बेक करा. ब्रेड पिझ्झा तयार.

ब्रेड डोसा

ब्रेडच्या कडा काढून टाका. आता ब्रेड पाण्यात भिजून १ मिनिट तसाच ठेवा आणि मग पाणी काढून टाका. मिक्सरच्या भांड्यात तांदुळाचे पीठ, रवा, दही, ब्रेड, आले, हिरवी मिर्ची, मीठ आणि थोडेसे पाणी टाकावे. मिश्रण फिरवून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे टाकून फोडणी करावी आणि त्यात कांदा घालून परतावे. मग कोथिंबीर चिरून घालावी आणि गॅस बंद करावा. परतलेले मिश्रण तयार पीठात घालावे. आणि नॉनस्टिक तव्यावर डोसे घालावेत.

ब्रेड ऑम्लेट टोस्ट

यासाठी दोन अंड्यांचे ऑम्लेट तयार करून घ्यावे. दोन ब्रेडच्या स्लाईस घ्याव्यात. एकाला लोणी आणि एकाला सॉस किंवा आवडीप्रमाणे चटणी लावावी. आता त्यात ऑम्लेट ठेवावे आणि मग दुसरा स्लाईस ठेवावा. आता सँडवीच टोस्टरमध्ये टोस्ट करावे.

फ्रेंच टोस्ट

यासाठी एका बाऊलमध्ये दोन अंडी फेटून घ्यावीत. त्यात मिरची, मीठ, तिखट,कोथिंबीर चिरून घालावी. आवडत असल्यास कांदा बारीक चिरुन घालावा. हे सर्व मिश्रण चांगले फेटावे. आता एका ब्रेडच्या स्लाईसचे चार त्रिकोणी किंवा चौकोनी तुकडे करावेत. पॅन गॅसवर ठेवावा. ब्रेडचा प्रत्येक तुकड्यावर हे मिश्रण लावावे आणि तेलावर परतून घ्यावे. सॉस बरोबर ही उत्तम न्याहारी आहे.

गार्लिक ब्रेड

बच्चे कंपनीला पिझ्झाच्या बरोबरीने आवडणारा हा पदार्थ आहे. त्यासाठी ब्रेडचे स्लाईस घ्या. त्याचे चौकोनी तुकडे करा. २ चमचे बटर, ३-४ पाकळ्या लसूण खिसून घेतलेला किंवा बारीक ठेचलेला, रेड चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, आवडत असल्यास काळी मिरी पावडर, मीठ गरजेनुसार घ्यावे. मीठयुक्त किंवा साधे बटर घ्यावे. मीठ नसेल तर मीठ घालावे. मग ठेचलेला किंवा किसलेला लसूण टाकावा. हे मिश्रण चांगले फेसावे. आता हे लसूण घातलेले बटर ब्रेडला लावावे. गॅसवर तवा ठेवावा. त्यावर बटर लावलेल्या स्लाईस ठेवाव्यात. त्यावर झाकण ठेवावे. ब्रेडचा रंग सोनेरी होईपर्यंत झाकून ठेवावे. सोनेरी रंग आला की आवडीनुसार चिली फ्लेक्स, ऑरगॅनो टाकावेत. गरम गरम सव्र्ह करावे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon