Link copied!
Sign in / Sign up
65
Shares

विविध भातांच्या मस्त रेसिपी

 

देशाच्या काही भागात भात हा मुख्य आहार आहे. आपल्याकडे कोकणात, खाली दक्षिणेकडे आणि पुर्वांचल राज्यात भात खाण्याचे प्रमाण अधिक असते. लहान मुलांनाही जेव्हा सहा महिन्यानंतर घन आहार सुरु केला जातो त्यात भाताचे खिमट किंवा कण्हेरी हीच पहिल्यांदा दिली जाते.

भाताचे विविध प्रकार करता येतात. अगदी वरणभातापासून ते खिचडी पर्यंतचे अनेक प्रकार करता येतात. त्या गोड भाताचेही काही प्रकार आहेत.

भाताचे विविध प्रकार-

खिचडी

भारतीय जेवणात विविध भागांत विविध प्रकारे केली जात असेल पण डाळतांदुळाची खिचडी हा सार्वत्रिक प्रकार आहे. डाळखिचडी साठी सालीची मुगडाळ, बिनसालीची मुगडाळ, तूरडाळ, मसूर डाळ वापरली जाते. खिचडी करताना डाळ आणि तांदूळ हे शक्यतो समप्रमाणात घ्यावे आणि ते धुवून घ्यावे.

पातेल्यात तूप किंवा तेल घालून त्यावर जिरे मोहरी घालावी. कढीपत्त्याची पाने टाकावीत. हिंग घालावा. त्यात धुवून निथळलेले डाळ तांदुळ टाकावेत. ते चांगले परतावेत. त्यात गोडा मसाला किंवा काळा मसाला घालावा. आवडत असल्यास दाणे भिजवून घालावेत. मीठ घालावे. आणि गरम पाणी घालून खिचडी मऊसर शिजवून घ्यावी. खायला देताना तूप आणि कोथिंबीर घालावी.

जिरा राईस 

दोन वाट्या बासमती तांदुळ धुवून निथळून घ्यावा. २ चमचे साजूक तुप, २ चमचे जिरे, पाव चमता शहाजिरे, चवीनुसार मीठ आणि गरम पाणी.

तांदुळ धुवून निथळून घ्यावेत. २ वाट्या तांदुळ असतील तर ४ वाट्या पाणी उकळावे. जाड बुडाचे पातेल गॅसवर ठेवून त्यात २ चमचे तूप टाकावे. तूप गरम झाले की जिरे, शहाजिरे घालावे. मग तांदुळ गुलाबी रंगावर परतावेत. उकळते पाणी घालून चवीपुरते मीठ घालून शिजवावे. मंद गॅसव भात शिजवावा. हा भात मोकळा शिजला पाहिजे. चिकट होता उपयोगी नाही. भाज शिजत आल्यानंतर पातेल्याखाली तवा ठेवावा.

पुलाव

यासाठी लांबसडक बासमती तांदूळ वापरावा. तांदूळ निवडून आणि धुवून घ्यावा. व्हेज पुलाव करण्यासाठी फ्लॉवरचे तुरे, मटार, गाजराचा मधला दांडा काढून तुकडे, श्रावण घेवडा लांबट चिरून घ्यावा, टोमॅटो, कांदे घ्यावेत. एक इंच आले, ५-६ लसूण पाकळ्या वाटून घ्याव्यात. भाज्या चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्याव्यात. कांदे उभे पातळ चिरावेत. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.थोडा कांदा तेलावर कुरकुरीत परतून बाजूला ठेवावा. आवडत असल्यास काजुपाकळीही तळून बाजुला ठेवावी.

पुलाव क़रण्यासाठी जाड बुडाच्या पातेल्यात दोन चमचे तूप टाकावे. गरम झाल्यावर त्यावर लवंग, दालचिनीचे तुकडे, काळी मिरी, वेलची, तमालपत्रे घालून खमंग भाजावे. त्या नंतर उरलेला कांदा घालून परतावे. मग भाज्या घालाव्यात, आले लसणाची पेस्ट टाकावी. भाज्या परतल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी. मग धुवून निथळलेले तांदुळ घालून छान परतून घ्यावेत. तांदळाच्या दुप्पट आधणाचे म्हणजे गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. मंद आचेवर पुलाव शिजवावा. तांदुळाचा दाणा बोटचेपा झाला की पुलाव तयार. शेवटी चमचाभर तुप सोडून गॅस बंद करावा. वाढताना पुलावावर कुरकुरीत कांदा घालावा.

कैरी भात

दोन वाट्या मोकळा शिजवलेला भात, अर्धी वाटी कच्ची कैरी किसून, अर्धी वाटी तेल, दोन लाल सुक्या मिरच्या, १ वाटी खवलेला नारळ, १ चमचा मोहरी, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी दाणे भाजून सोलून. आवडत असल्यास काजू पाकळी

तेलाची फोडणी करून त्यात मिरच्या, कढीपत्ता, दाणे आणि काजू थोडे परतावेत. ही फोडणी तयार शिजलेल्या भातावर घालावी. भातावर कैरीच किस आणि चवीप्रमाणे मीठ घालावे. एक चमचा मोहरी आणि १ वाटी खोवलेला नारळ वाटून भातावर घालावा. हलक्या हाताने भात कालवावा.

बिसी बेळी अन्ना

२ वाट्या तांदुळ, १ वाटीभर तुरीची डाळ, दोन मोठे चमचे तेल, कढीपत्त्याची पाने, ४-५ सुक्या मिरच्या, सांबार मसाला, चिंचेचा कोळ, मीठ चवीनुसार, फोडणीचे साहित्य, १ टेबलस्पून साजूक तूप

२ वाट्या तांदुळाचा भात आणि १ वाटी तुरीची डाळीचे वरण कुकरला लावावे. पातेलीत तेल टाकून गरम करावे. त्यात मोहरी, हिंग , कढीपत्ता, हळद, आलं, मिरच्यांचे तुकडे टाकावेत. वरण घोटून फोडणीला टाकावे. चिंचेचा कोळ, सांबार मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालावे. आता शिजवलेला भात घालून घोटावे. पातळ पळीने वाढता येईल असा इतपत पातळ करावा. चांगली वाफ येऊ द्यावी. गॅस बंद क़रण्याआधी १ चमचा साजूक तुप सोडावे. खायला देतानाही साजूक तुप वाढावे.

दही बुत्ती

दोन वाट्या शिजवलेला भात, २ वाट्या दही, दुध, थोडी साय. ५-६ हिरव्या मिरच्या, कढीqलबाची पाने, मोहरी, हिंग, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर.

२ वाट्या तांदळाचा भात शिजवून गार करुन घ्यावा. एका मोठ्या बाऊनमध्ये भात घेऊन त्यात चवीपुरते मीठ, दही, साय, दूध घालून सरबरीत कालवावा. १ टेबल स्पून तेलात मोहरी, हिंग , सुक्या मिरच्या आणि कढीलिंब घालून भातावर घालावी. सर्व छान मिसळून त्यावर कोथिंबीर पेरावी.

उन्हाळ्यात हा भात खाताना त्यात पांढरे कांदे चिरून घालावे आणि लगेचच भात खावा. तसेच सुक्या लाल मिरच्यांऐवजी सांडगी मिरच्या तळून घातल्या तरीही भाताला उत्तम चव येते.

भाताचे काही गोड प्रकार

नारळीभात 

१ वाटी जुना आंबेमोहोर तांदुळ, दीड वाटी पिवळा गुळ, ३-४ लवंगा, वेलदोड्याची पूड, ४ चमचे साजूक तूप आणि अर्धा नारळ खवून घेणे

तांदुळ निवडून धुवून निथळावेत. २ चमचे तुपावर लवंगा टाकून भात परतून घ्यावा. त्या आधणाचे दुप्पट पाणी टाकावे. भात मऊसर शिजला पाहिजे. भात परातीत मोकळा करून ठेवावा. जाड पातेल्यात १ चमचा तूप टाकावे. त्यात भात, नारळ आणि गुळ घालावा. पातेल्याखाली तवा ठेवून मंद गॅसवर२-३ वाफा आणाव्यात. वेलदोडा पूड घालावी, १ टेबलस्पून तूप बाजूने सोडावे.

साखरभात

२ वाट्या जुना आंबेमोहर तांदुळ, ३ वाट्या साखर, ३-४ लवंगा, वेलदोड्याची पूड, ४ चमचे साजूक तूप, केशर किंवा केशरी रंग, अर्ध्या लिंबाचा रस, काजू, बदाम यांचे काप

तांदूळ जुनाच वापरावा, तो निवडून धुवून चाळणीत अर्धा तास निथळावा. जाड बुडाच्या पातेल्यात तुप टाकून त्यावर लवंगा घालून तांदूळ परतावा. त्यात तांदळाच्या दुप्पट उकळलेले पाणी घालावे. भात मोकळा शिजवून घ्यावा. चिकट होता कामा नये. शिजल्यावर तो भात परातीत मोकळा गार करायला ठेवावा. गार झाल्यानंतर त्यावर लिंबाचा रसात रंग घालून ते घालावे. आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर घालून त्यात १ भांडे पाणी घालावे. हा पाक गोळीबंद म्हणजे पक्का पाक झाला पाहिजे. दोन बोटात पाक धरल्यास तो अगदी चिकट असला पाहिजे. मग गॅस बंद करून त्यात वेलदोडा पूड, बदाम काप, बेदाणे घालावेत. केशरी रंग घातलेला भात घालावा. मंद गॅसवर हे पातेले ठेवावे. दोन वाफा आणाव्यात. मग भातावर तूप सोडावे आणि पुन्हा एक वाफ आणावी आणि गॅस बंद करून पातेले तसेच ठेवावे म्हणजे भात मुरतो. हा भात खाण्यापुर्वी किमान दोन तीन तास आधी करावा जेणेकरून तो छान गोड लागेल 

अननस भात

२ वाट्या बासमती तांदुळ, ३ भांडी साखर, ४ चमचे तूप, अननस कापून बारीक तुकडे करून साखरेच्या पातळ पाकात वाफवून निथळून घ्याव्यात किंवा डबाबंद अननसाच्या फोडी वापराव्यात.

साखरभाताप्रमाणेच भात शिजवून घ्यावा. डब्यातील अननस वापरल्यास त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. नसता बारीक तुकडे वाफवलेले वापरावेत.

गार भाताला लेमन रंग लावून घ्यावा. तसेच थोडे पायनापल इसेन्स घालावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप लावून भात, साखर आणि अननसाच्या फोडी असा थर लावून घ्यावा. मंद आचेवर पातेले ठेवावे. त्यावर घट्ट झाकण ठेवून दोन वाफा आणाव्यात. उरलेले सर्व तूप टाकावे. गॅस बंद करून अर्धा तास तसाच ठेवावा म्हणजे भात मुरतो. वाढताना भातावर अननसाचे तुकडे, लाल चेरीज आणि मोसम असल्यास गोड द्राक्षांचे अर्धे तुकडे करून सजवून वाढावे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon