Link copied!
Sign in / Sign up
35
Shares

तुमच्या बाळाचा जन्मानंतर, पहिल्या महिन्यापासून घ्यायची काळजी

तुमचे बाळ बऱ्याच पद्धतीने तुमचे आयुष्य बदलून टाकते. तुमचे बाळ आणि त्याचे गोंडस अस्तित्व तुम्हाला कितीही हवेहवेसे वाटत असले तरीही त्याच्या जन्मानंतरचा हा पहिला महिना तुमच्यासाठी अवघड ठरू शकतो. तुम्ही बाळासाठी खूप अगोदरपासून तयार असता. त्याच्या आगमनानंतर त्याची काळजी कशी घ्याची, लक्ष कसे द्यायचे याची २४*७ तयारी तुम्ही करून ठेवलेली असली तरीही या कामासाठी तुम्ही एकटे पुरेसे नसता. आम्ही तुमच्यासाठी बाळाच्या या पहिल्या महिन्याच्या देखभालीसाठी काही टिप्स देत आहोत, त्या जाणून घ्या आणि तुमच्या बाळासोबतच्या या प्रवासाला उत्साहाने सुरवात करा.

१) मदत घ्या

तुम्ही एकट्या काही सुपरवुमन नाही, तुम्हाला बाळाच्या देखरेखीसाठी पहिल्या महिन्यात खूप लोकांच्या मदतीची गरज लागणार आहे. त्यामुळे मोठेपणा किंवा लहानपणा अजिबात न मानता जेंव्हा तुम्हाला कोणी मदत करू इच्छित असेल तर ती जरूर स्वीकारा. तुम्ही स्नान करत असतांना बाळाकडे लक्ष देण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला लागेल तशी मदत मागून घ्या. तुमच्यावरील कामाचा ताण यामुळे नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

२) पालकत्वाच्या जबाबदाऱ्या वाटून घ्या

तुम्ही दोघे जसे आयुष्यभरासाठी साथीदार आहात तसेच तुम्ही बाळाच्या संगोपनातही एकमेकांचे साथीदार आहात. हे काम तुमच्या दोघांपैकी एकानेच करायचे ठरवले तरीही ते अवघड आहे. तुमच्या दोघांच्या कामाच्या वेळेला अनुसरून बाळाच्या देखभालीचे काम वाटून घ्या. तुमच्यात सामंजस्य असेल तर ह्यात अडचण येणार नाही. दोघांच्या निवडीप्रमाणे कोणी काय करायचे हे ठरवा. यात स्वार्थी होऊन चालणार नाही, दोघांच्या मताप्रमाणे निर्णय घेतल्यास हे काम सोप्पे होईल.

३) एक दिनचर्या ठरवा

बाळाच्या दिवसाप्रमाणे अॅडजस्ट करून तुमचाही दिवस आखून घ्या. बाळाच्या दिवसभरातल्या कामांची आखणी करा. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा ठरवून घ्या. बाळाला दुध पाजणे, त्याची झोपण्याची वेळ, त्याचे मालिशची वेळ अशा सगळ्या गोष्टींचा दिनक्रम ठरवून घेतला की बाळालाही ती सवय लागेल. तुमचे रुटीन सुरु झाले की या सर्व कामातून तुम्हाला थोडासा वेळही मिळेल आणि तुम्ही तो वेळ तुमच्या इतर गोष्टींसाठी देऊ शकाल.

४) बाळ झोपेल तेंव्हा तुम्ही झोपा

तुम्ही हा सल्ला अनेक जणांकडून ऐकला असेल. हा सल्ला मानून त्याप्रमाणे केल्यास तुम्हाला खूप फायदाही होईल. बाळ जेंव्हा जागे असते तेंव्हा ते खेळते आणि तुम्ही देखील रमता. बाळ झोपेतून उठून रडायला लागले की तुमची झोप मात्र होत नाही. त्यामुळे बाळ झोपलेले असते तेंव्हा आराम करा किंवा झोप घ्या. तुमच्या शरीराची झीज भरून निघणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. तुमची झोप झाली असेल तर तुम्ही उत्साहाने बाळाची काळजी घेऊ शकाल. तुम्हीच तुमची काळजी घ्या, झोप पूर्ण घ्या आणि निरोगी राहा.

५)  नकार देणे चूकीचे नाही

तुम्हाला आधीच प्रसूतीनंतरच्या शारीरिक आरामाची गरज असते आणि बाळाची देखभाल करणे सुद्धा तुमची प्रायोरिटी असते त्यात तुम्हाला काही अजून जबाबदाऱ्या आणि कामे करण्याचा ताण घेण्याची गरज नाही. घरातली इतर कामे पाहणे, कुठे आमंत्रण असेल किंवा कोणी घरी येणार असेल, अशा गोष्टींना तुम्हाला जमत नसेल तर नकार देण्यात काहीही चुकीचे नाही. तुम्हाला पूर्वीसारखे बाहेर जाणे करायचे असेल तर तुमचे बाळ थोडेसे मोठे होण्याची वाट पाहण्यात काहीच हरकत नाही. जेंव्हा तुमचा मूड असेल तेंव्हाच ही जास्तीची कामे घ्या. शेवटी बाळाची देखभाल आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही महत्वाचे आहे.

६)  पोषक आहार

 

तुम्ही एका नवीन जीवाला जन्म दिला आहे आणि तुमचे शरीर या काळात कमजोर असते. तुम्हाला बाळासोबत तुमच्या पोषक आहाराकडे देखील लक्ष देण्याची देखील गरज आहे. कामाच्या व्यापात तुम्ही जर जंक फूड किंवा अवेळी जेवण अशा गोष्टी करत गेला, तर तुमच्या शरीराला बळकट होण्यासाठी लागणारी उर्जा मिळणार नाही, परिणामी बाळाच्या आरोग्यावरही ते दिसून येईल. तेंव्हा आहार योग्य ठेवण्यास विसरू नका. तुम्ही उत्तम राहिलात तर बाळही तसेच राहील.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon