Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

मुलांना बाहेरच्या पदार्थाना नाही म्हणा आणि हे पर्याय द्या


 

मुलांनी जेवावे आणि पोषक पदार्थ खावेत यासाठी तमाम आया आटापिटा करतात. त्यातच मुलांना बाहेरच्या पदार्थांचे विशेष आकर्षण असते. अर्थात मुलेच का मोठ्यांनाही बाहेरच्या पदार्थांचे आकर्षण वाटतेच. एक तर हे पदार्थ दिसायलाही आकर्षक असतात त्यात ते चटकदार असतात. शिवाय टीव्हीवरील जाहिराती ह्या सर्व गोष्टींना खतपाणीच घालत असतात. टीव्हीवर लहानग्यांना भुरळ पाडणाऱ्या पदार्थांच्या जाहिराती ह्या त्यांच्या वयोगटातील किंवा थोड्या मोठा वयातील मुले करतात. त्यामुळे आपल्या घरातील बच्चे कंपनीला ते पदार्थ योग्यच असल्याची खात्री होते. त्यामुळे माध्यमांनी कल्लोळ माजवलेल्या या जमान्यात पालकांपुढे मुलांना या बाहेरील पदार्थांना पर्यायी पदार्थ कोणते द्यावे याची चिंता सतावत असते.

चॉकलेटचा अतिरेक

जाहिरातबाजीच्या काळात चॉकलेटचा मुलांच्या आहारातील प्रमाण वाढले आहे. मुलांना आवडते म्हणून किंवा त्यांच्या पोटात काहीतरी जावे यासाठी पालक त्यांना चॉकलेटयुक्त पदार्थ देत रहातात. उदा. दूध प्यावे म्हणून चॉकलेट पावडर किंवा तत्सम पावडर, केक, बिस्किट.

जंक फूड

मुलांना सतत वेफर्स, फरसाण किंवा तत्सम पदार्थ देणे. मुलांनी काही तरी खाल्ले पाहिजे हे पालकांना एक काम वाटते त्यामुळे मुलांच्या आवडीचे पदार्थ, पॅकबंद ज्यूस देण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान लहान मुलेही वेफर्स, कोल्ड qड्रक आवडीने पिताना दिसतात पण ते घरातीलपदार्थ त्यांना नकोसे होतात. मग पालकही काहीतरी खातेय ना मग द्या आवडते ते असे म्हणून वेळ मारून नेतात.

या सर्वांचा मुलांच्या आरोग्यावर खूप लहान वयातच परिणाम होताना दिसतो. हल्ली लहान वयातील स्थूलतेचे प्रमाण आणि त्या अनुषंगाने होणारे आरोग्याचे त्रास यावर अनेकदा चर्चा होते. कल्पनाशक्तीला ताण देऊन दर घरीच काही हटके पदार्थ बनवले तर मुलांनाही ते नक्कीच आकर्षित करतील आणि अर्थातच आवडतीलही.

मुळात जंक फूड कडे मुलांचा ओढा असतो कारण ती सहज उपलब्ध होतात आणि खायला फार कष्ट करावे लागत नाहीत. अशा वेळी कोणते पदार्थ घरात करता येतील किंवा ठेवता येतील.

फळे-

ताजी आणि मोसमी फळे हा उत्तम आहार आहे. त्यासाठी मुलांना बाजारात नेऊन त्यांना हवी ती फळे आणायला प्रोत्साहन द्यावे. घरात आल्यावर त्यांचा हात पोहोचेल अशा ठिकाणी ती ठेवावी.

चीज-

मुलांना चीज खूप प्रिय आहे. दुग्धजन्य पदार्थ असल्याने तो मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास पोषक आहे. हल्ली कमी फॅट असणारे चीजही मिळते. कुकी कटरने फळांचे विविध आकारातील तुकडे करून आणि चीजचेही तुकडे करून एका टुथपीक ला लावून द्यावे. मुले खुष होऊन खातील.

स्मुदीज -

हा पोषक प्रकार लहान मुलांना नक्कीच आवडेल. घरच्या घरी करण्यासही सोपा प्रकार आहे. स्ट्रॉबेरी, आंबा, केळ अशी फळे आणि गोड दही यांचा वापर करुन स्मुदी बनवता येतील.

दही-

दह्यामध्ये पचनाला मदत करणारे चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे मुलांना दही खायला द्यावे. त्यात विविध फळे घालून कँडी सारखेही बनवता येईल.

वेफर्स-

बटाट्याचे पातळ काप करून तळण्याऐवजी ते बटर लावून बेक केले तरीही उत्तम चमचमीत स्नॅक्स तयार होतो.

सँडवीच-

विविध प्रकारचे सँडवीच अगदी विकत मिळतात तशीच पण पोषक घटक वापरून घरी मुलांना करुन देता येईल. त्यात चीज, पीनट बटर, भाज्या यांचा वापर करता येईल.

पोळीचे वेफर्स-

पोळीचे तुकडे करून ते तेलावर कुरकुरीत परतवून त्यावर मीठ मसाला घालून वेफर्स म्हणून देऊ शकता.

फ्रॅकी-

पोळीवर विविध भाज्यांचे मिश्रण आणि थोड्या घरातच शिजवून परतवलेल्या नूडल्स घालून फ्रॅकी करता येईल. कणकेच्या पोळीचा वापर केल्याने मैदा पोटात जाणार नाही. चीज चाही प्रमाणित वापर करता येईल.

पास्ता-

हल्ली गव्हाचा पास्ता मिळतो. तो आणून घरीच भाज्या आणि मलई घालून पांढऱ्या सॉसचा पास्ता करु शकतो.

मठरी -

मुलांना तेलकट चटकदार खायला आवडते तर घरीच गव्हाचे पीठ, बेसन आणि मेथीच्या भाजीची पाने वापरून मठरी करु शकतो. तळून करावी लागली तरीही घरीच उत्तम दर्जाच्या तेलात तळल्याने त्याचा त्रास होणार नाही.

केक, बिस्कीटे-

मुलांना या दोन्ही गोष्टी आत्यंतिक आवडीच्या असतात. या दोन्ही गोष्टी घरीच गव्हाच्या पीठाचा वापर करुन तयार करु शकतो. अगदी बाजारातील चव आली नाही तरीही विविध पदार्थ, सुकामेवा, फ्लेवर्स वापरून केक तयार करता येतात. काही प्रकारची बिस्कीटेही घरी बनवता येतील.

पिझ्झा-

घरी पोळीवर लोणी लावून भाज्या टाकून तसे त्यावर खिसलेले चीझ टाकून पिझ्झा बनवून देऊ शकतो. हा बाहेरील पिझ्झा पेक्षा नक्कीच आरोग्यदायी असेल.

या पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या पुऱ्या, चिवडे करून देता येतील. तसेच घरच्या घरी पाणीपुरी, भेळ आदी पदार्थही करता येतील.

वरील विविध पदार्थ मुलांना द्यावेतच पण काही गोष्टींचे पथ्य आईवडिलांनीही पाळायला हवे.

आमिषे नको-

अनेकदा पालक मुलांना हे खाल्लेस तर अमूक करता येईल असे आमिष दाखवून मुलांना एखादा पदार्थ खायला लावतात. प्रत्येक चवी माहिती करुन घेतल्या पाहिजेतच पण त्यासाठी आमिष नको. कदाचित आमिषापोटी मुले खातील पण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आमिषाची सवय लागेल. त्यामुळे वाढलेला पदार्थ खाऊन पाहाण्याची सवय मुलांना लावावी.

हाताने घेऊ द्या. -

मुलांना पोषक पदार्थ जसे सुकामेवा वगैरे हाताने घेऊन खाऊ द्या. ते घेतील आणि खातच बसतील म्हणून हाताशी येणारच नाहीत अशा ठिकाणी ठेवू नका. त्यापेक्षा मुलांना किती प्रमाणात आणि किती वेळा खायचे ते समजावून सांगा आणि अतिप्रमाणात खाल्ल्यास होणारा त्रासाची कल्पना द्या.

नको ते पदार्थ आणूच नये-

जे पदार्थ मुलांच्या दृष्टीने अनारोग्यकारी आहेत ते पदार्थ घरातच आणू नयेत आणि मुलांच्या समोर मोठ्यांनी खाऊही नयेत.

प्रयत्न सोडू नका-

मुले खात नाहीत म्हणून प्रयत्न सोडू नका. मुलांच्या आवडी निवडी बदलत असतात त्यामुळे एखादा पदार्थ ते आज खातील आणि उद्या खाणारही नाहीत. त्यामुळे धीराने परिस्थिती हाताळा. अन्यथा मुले खातच नाहीत म्हणून त्यांना आवडीचे पदार्थ देण्याकडे कल वाढतो.

टीव्हीवर नियंत्रण-

टीव्हीवरील जाहिरातींचा परिणाम होतोच त्यामुळे जेवताना टीव्ही बघण्यावर हळू हळू निर्बंध आणावेत.

 

 

 

 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon