Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

तुम्हांला लिंबाचे हे आरोग्यविषयक आणि सौंदर्यविषयक उपयोग माहिती आहेत का ?

लिंबू हे आपल्या सर्वांच्या घरात नेहेमी असणारे रसरशीत फळ आहे. पटकन सरबत करायचे असल्यास किंवा चिवडा अथवा भाजीत चटकदार चव आणायची असल्यास आपण लगेच लिंबू पिळून घेतो. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे त्याला ही आंबट चव प्राप्त होते. विटामिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे लिंबाचा वापर हा आरोग्यासोबत त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी देखील करतात.

लिंबू हे जगातील असे एकमेव फळ आहे ज्यात नकारात्मक आयन असतात. म्हणजेच हा एक अॅनीआॅनिक पदार्थ आहे. त्यामुळे हे मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यासोबतच लिंबात बी-कॉम्प्लेक्स, फाईबर, कॅल्शियम, लोह आणि फाॅस्फरस देखील असते. याच्यातील गुणधर्म आपल्याला आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने कसे उपयोगी ठरू शकतात ते आपण पाहू.

१. अन्नपचन सुधारते.

आयुर्वेदात लिंबाचे खास महत्व सांगितले आहे. हे सांगतांना ‘लिंबू हे आंबट, उष्ण, जठराग्नी वाढवणारे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आणि हलके’ असे वर्णन केले आहे. लिंबू हे पचनासाठी उत्तम असते, जेवणानंतर ताटातील लिंबाचा रस घेणे पचनासाठी उपयुक्त ठरते. पोट बिघडले असेल व पचनाचा त्रास होत असेल तर साध्या पाण्यात लिंबू आणि अद्रकाचा रस आणि थोडा मध मिसळून प्यावे. याने अपचनामुळे होणारी मळमळ लगेच थांबते.

२. पोट साफ होते.

लिंबातील गुणधर्म आतड्यांचे आंत्रचलन वाढवतात ज्यामुळे पचनसंस्थेत अन्न लवकर पुढे सरकते आणि पोट सहज साफ होते. तुम्हाला जर जड कोठ्याचा त्रास असेल तर सकाळी उठल्यावर ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून प्यावे. याने शरीरातील टोक्सिंस निघून जाण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होईल.

३. विटामिन सी युक्त आणि उर्जादायक.

लिंबात भरपूर प्रमाणात आढळणारे विटामिन सी हे शरीरातील टिश्यूंच्या वाढीसाठी आणि पुनर्विकासासाठी उपयोगी असते. याने त्वचेतील कॉलेजन ची निर्मिती वाढते आणि त्वचा चमकदार दिसू लागते. विटामिन सी हे शरीरात लोह शोषून घेण्याचे काम करते. खास करून उन्हाळ्यात लिंबू आपल्या बरेच उपयोगी पडते. लिंबू आणि साखर पाण्यात मिसळून घेतल्यास आपल्याला उर्जा मिळते आणि फ्रेश वाटते.

४. अँटिबॅक्टेरिअल आणि दुर्गंधी नाशक.

लिंबामध्ये अॅंटिबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. एका संशोधनाद्वारे असे देखील सांगता येते की, लिंबू मलेरिया, कॉलरा आणि टायफाइड चे जंतू मारण्यासाठी प्रभावी आहे. यासोबतच लिंबू आतड्यातील जंतांचा देखील नाश करते.

घामामुळे शरीरातून दुर्गंधी येते. काखेतून दुर्गंधी येत असल्यास काखेत लिंबू चोळावे आणि १० मिनिटांनी धुवून टाकावे. तसेच ग्लासभर पाण्यात १ लिंबू पिळून ओल्या केसांवर लावावे, ५ मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवावे याने केसांची दुर्गंधी दूर होईल.

५. टॅन रिमूव्हर .

वरती सांगितल्याप्रमाणे लिंबू हे विटामिन सी ने भरपूर असते, विटामिन सी हे त्वचेत कॉलेजनची निर्मिती करण्यास मदत करते. त्वचेच्या पेशी पुनर्निर्मित होण्याच्या प्रक्रियेला लिंबामुळे वेग मिळतो. लिंबू हे नैसर्गिक ब्लीच सारखे काम करते. त्वचा उन्हामुळे काळी पडली असेल तर लिंबाच्या रसात थोडे मसूर डाळीचे पीठ किंवा मध घालून चेहेऱ्यावर लावावे आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहेरा धुतल्यास त्वचेला तजेला मिळतो.

६. तेलकट त्वचेवरील उपाय.

लिंबू हे त्वचेवरील तेल कमी करण्यास अत्यंत प्रभावी आहे. काही जणांना सकाळी उठल्यावर नाकावर तसेच गालांच्या उंचवट्यावर तेल जमा होते. हे तेल त्वचेतूनच बाहेर येते आणि त्वचा दिवसभर तेलकट दिसते. यामुळे चेहेरा देखील काळवंडतो. सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने चेहेरा धुवून त्यावर लिंबू चोळा आणि वाळल्यावर चेहेरा थंड पाण्याने धुवा. या उपचाराने त्वचा दिवसभर फ्रेश आणि कमी तेलकट दिसेल.

७. अॅस्ट्रिंजंट आणि स्कीन टोनर.

रोजच्या जीवनातील ताण तणाव आणि खूप वेळ एसी मध्ये काम करत राहणे यामुळे त्वचा तजेलदार राहत नाही. यावरील एक उत्तम उपाय म्हणून तुम्ही लिंबाचा वापर फेशिअल वाइप्स बनवण्यासाठी करू शकता. काही ४-५ चमचे लिंबाचा रस आणि त्यात टी-ट्री ओईल चे ७-८ थेंब टाका. हे मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये डिस्टिल्ड पाण्यात टाकून भरून ठेवा. फेल्ट पेपरचे हातरुमालाच्या आकाराचे तुकडे वापरून तुम्ही या स्प्रेचा वाइप्ससारखा वापर देखील करू शकता.

 

८. वजन आणि त्वचेसाठी उपयुक्त

तुम्हाला वजन घटवायचे आहे का? थोड्याश्या कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने पचन संस्था तर उत्तम राहतेच आणि सोबतच वजन कमी करण्यासही मदत होते. शरीरातील टोक्सिंस बाहेर काढून चयापचय क्रिया सुधारण्याचे काम लिंबू करते. याद्वारे वजन कमी करण्यास तुम्हाला मदत होईल. त्वचेसंबंधी तक्रारी कमी होऊन चेहऱ्यावर डाग येणे, पिंपल्स येणे कमी होते. तुम्ही वापरात असणाऱ्या घरगुती फेस पॅक मध्ये सुद्धा लिंबाच्या रसाचा वापर तुम्हाला तजेलदार त्वचा मिळवून देईल.

तुम्ही लिंबाचे हे उपयोग वाचले आहेतच तर आता रोजच्या जेवणात लिंबाचा वापर करण्यास विसरू नका. ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे त्यांनी मात्र लिंबाचे सेवन प्रमाणात ठेवावे.
Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon