Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

गरोदरपणात बाळाच्या हालचालींवरून त्याच्या झोपेचे वेळापत्रक कळू शकते का ?

 

आई होण्याची चाहूल लागणे खूप आनंददायी असते पण त्याबरोबर नव्या प्रश्नांची मालिका मनात जन्माला येते. पहिलटकरीण असलेल्या आयांना अनेक प्रश्न सतावत असतात. बरे या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवण्यासाठी आया, सासवा यांच्याकडे जावे तर ती मिळतील असे नाही. गर्भावस्थेचे टप्पे जसे पुढे पुढे जातात तसे प्रश्नही बदलू लागतात.

गर्भावस्थेच्या १६ ते २० आठवड्यापासून स्त्रीला बाळाच्या हालचाली जाणवतात. मग आईला प्रश्न पडतो की बाळ गर्भावस्थ्येत झोपते की नाही किंवा त्याची झोपण्याची वेळ काय.

आईच्या झोपेच्या वेळेत हालचाल-

बहुतांश आयांना याचा अनुभव आला असेलच. गर्भावस्थेत जेव्हा बाळाची हालचाल जाणवायला लागते तेव्हा होणाऱ्या आईच्या असे लक्षात येते की जेव्हा ती आराम करते आहे किंवा झोपली आहे तेव्हा बाळाची हालचाल अधिक वेगाने होते. काही वेळा बाळाची हालचाल अगदीच जाणवत नाही. अशा वेळी प्रश्न नक्कीच सतावतो की प्रसुतीनंतरही बाळाच्या झोपेच्या वेळा अशाच राहाणार का. म्हणजे ते दिवसा झोपा काढणार आणि रात्री जागवणार का.

अंदाज बांधणे कठीणच-

गर्भातील अर्भक आपण झोपल्यावर लाथा मारते ही गोष्ट आई म्हणून आनंददायी असतेच पण त्यामुळे बाळ रात्री जागे असते की काय अशी शंका येते आणि मग ते रात्री आपल्याला जागवणार ही भीती वाटते. पण ही भीती अनाठायी असते असे मला वाटते. कारण एक तर बाळाला दिवस रात्र यातला फरक गर्भाशयात असताना कळत नसतोच पण जन्माला आल्यानंतरही काही दिवस हे समजत नाही. तसेच गर्भारपणातील बाळाच्या हालचालींवरून ते व्यवस्थित झोप घेणे आहे किंवा नाही याचाही अंदाज बांधला जाऊ शकत नाही. त्यामुळे गर्भावस्थेत असताना बाळाच्या झोपेच्या दैनंदिनीविषयी फार आखाड बांधण्यात हशील नाही.

बाळाच्या हालचाली आणि झोप

बाळ गर्भाशयात कोणत्या वेळी हालचाल करते हे आईला माहित असते. त्यावरूनच बाळ शांत असेल तर झोपले असेल किंवा हालचाल करत असेल तर ते जागे असेल असा अंदाज बांधते. मात्र जन्म झाल्यानंतर बाळांच्या झोपेच्या वेळा पहिले तीन महिने तर नक्कीच बदलत राहातात. काही वेळा बाळ रात्रभ़र खेळत राहाते तर कधी रात्रभर झोपते फक्त भूक लागली की रडते. त्यामुळे गर्भात असतानाच्या हालचालीवरून बाळाच्या नंतरच्या झोपेची वेळेचा अंदाज चुकण्याची शक्यताच अधिक असते.

झोपेचे पॅटर्न-

मोठ्या माणसांच्या शरीराचे घड्याळ असते त्यानुसार ते झोपतात. सर्वसाधारण हे घड्याळ २४ तासांचे असते. शरीराचे जैविक घड्याळ हे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत असते. मुख्यत्वे दिवसाचा उजेड आणि रात्रीचा अंधार हे दोन महत्त्वाचे घटक यावर परिणाम करतात. जेव्हा अंधार पडतो तेव्हा आपल्या मेंदूला त्याची जाणीव होऊन तो झोपेसाठीचे हार्मोन्स मेलाटोनिन स्रवण्याचे आदेश देतो. त्यामुळे आपल्याला झोप येऊ लागते, आळस येतो.

बाळाची झोप

बाळ लहान असते त्यांच्या मेंदूचा विकास होण्याची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे बाळाला दिवसरात्र हा फरक पहिले काही दिवस बिलकुल कळत नसतो. त्यांच्यासाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ ही सारखीच असते. त्यामुळे लहान मुलांचा मेंदू रात्र झाली तरीही झोपेचे हार्मोन्स मेलाटोनिन स्रवू शकत नाहीत. गर्भाशयात असताना ते आईच्या वेळापत्रकावरच अवलंबून असतात. मात्र आईच्या दुधातून हे मेलाटोनिन हार्मोन्स रात्रीच्या वेळी बाळांमध्ये जाऊ शकतात त्यामुळे बाळ पेंगुळते. मात्र बाळांचे जैविक घड्याळ जोपर्यंत व्यवस्थित स्थिर होत नाही तोपर्यंत तरी बाळांच्या झोपेच्या वेळा बदलत राहातात. तसेही बाळ जन्मल्यानंतर त्याची झोप ही १६ ते १८ तास असतेच. अगदी सलग नाही पण थोडा थोडा वेळ बाळ झोपते. काही वेळा बाळ सलग चार ते सहा तास झोपते.

बाळ थोडे मोठे म्हणजे साधारण पंधरा दिवसाचे झाल्यानंतर बाळाच्या झोपेचा पॅटर्न विकसित करु शकतो. पंधरा दिवसाच्या बाळाला आपण दिवस रात्र यातला फरक शिकवू शकतो. दिवसा घरात माणसांचा वावर अधिक असतो, स्वच्छ उजेड, प्रकाश असतो तर रात्री वातावरण खूप शांत असते, घाईगडबड नसते. सगळेजण आराम करतात हे सांगू शकतो. बाळाला रात्र झाली हे कळण्यासाठी मंद प्रकाशाचे दिवे, शांतता राखावी. खूप जोरजोरात बोलू नये. तसेच रात्री दुध पाजतानाही बाळाशी फार बोलू नये.

बाळ एक महिन्याचे झाले की त्याची नजर स्थिर होते अशा वेळी त्यांना दिवस रात्रीतला फरक नक्कीच समजून येतो. तेव्हा बाळ दिवसा जास्त वेळ जागे राहून खेळते. ते झोपते सुद्धा मात्र आता झोपेचा कालावधी १८ तासांवरून कमी होत आलेला असतो. दिवसा तीन चार तास झोपतात पण रात्री सलग झोपण्याचा कालवधी वाढतो. मग बाळ जेव्हा तीन महिन्यांचे होते तेव्हा त्यांना दिवस रात्री मधला फरक व्यवस्थित कळू लागतो. काही बाळे रात्र झाल्यावर घाबरतात किंवा किरकिर करतात ते याच कारणाने. यानंतर बाळाचे रात्री सलग झोपण्याचे तासही वाढतात.

थोडक्यात काय तर बाळाने पोटात असताना रात्री आपण झोपलेले असताना लाथा मारल्या याचा अर्थ ते घुबडासारखे रात्री जागे राहिल आणि दिवसा झोपेल किंवा उलट होईल. असे कोणतेही आखाडे चुकू शकतात. बाळाच्या गर्भातील हालचालींवरून जन्माला आल्यानंतर ते काय करेल ह्याचा अंदाज घेणे खरोखरच अवघड आहे.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon