Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

गरोदर असताना पोहणे

गर्भावस्था हा बाईचा दुसरा जन्म असे म्हटले जाते. कारण या काळात अनेक बदल होत असतात. गर्भावस्थेत बाळाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी विशेष प्रयत्नही केले जातात. बहुतेकदा सर्व प्रकारे बाळ आणि गर्भावस्थेचा काळ सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण असावा यासाठी आहारापाासून ते झोपण्यापर्यंत अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. अगदी डॉक्टर सांगतात म्हणून व्यायामही नियमितपणे केला जातो.

गर्भावस्थेचा विचार करता काही वेळा पारंपरिक पद्धतीने चालणे, घरातील कामे करणे तसेच खाली बसून केर काढणे आदी गोष्टी करण्यास सांगितले जाते. बहुतेकदा गर्भारपणी चालणे हा व्यायाम अगदी शेवटपर्यंत केला जाऊ शकतो.  गर्भारपणात पोहणे हा एक उत्तम आणि सुरक्षित व्यायाम आहे. तसेच जरी पोहण्याची सवय नसेल किंवा पोहणे नव्याने शिकत असाल तरीही गर्भावस्थेत पोहणे सुरक्षित आणि सहजसाध्य आहे.

व्यायामाचे विविध प्रकार 

गर्भावस्थेतही प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे व्यायाम क़रण्यास सांगितले जाते. सुरुवातीच्या काळात योगासने केली जातात. त्यानंतर रोज तासभर चालणे हा व्यायाम सांगितला जातो. तर शेवटच्या काळात झेपतील तसा चालण्याचा व्यायाम, श्वसनाचे व्यायाम करण्यास सांगितले जाते. अनेकदा गर्भवती राहण्यापुर्वी स्त्रियांना नियमित पोहणे हा व्यायाम म्हणून क़रण्याची सवय असते.

गर्भारपणात पोहणे

गर्भवती झाल्यावर पोहण्याचा व्यायाम करावा की नाही याचा संभ्रम निर्माण होतो. पण गर्भारपणात पोहणे हा एक उत्तम आणि सुरक्षित व्यायाम आहे. तसेच जरी पोहण्याची सवय नसेल किंवा पोहणे नव्याने शिकत असाल तरीही गर्भावस्थेत पोहणे सुरक्षित आणि सहजसाध्य आहे. अर्थात प्रत्येक स्त्रीचे शरीर आणि प्रकृती वेगळी असते. त्यामुळे शरीर या व्यायामाला कसे आपलेसे करते किंवा प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पोहण्याचा व्यायाम करण्यापुर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.

पोहण्याच्या व्यायामाविषयी गैरसमज-

पोहण्याच्या तलावामधील पाण्यात क्लोरिन घातलेले असते. त्यामुळेच पोहण्याविषयी जास्तीत जास्त गैरसमज पसरलेले आहेत. क्लोरिनेटेड पाण्याचा गर्भावर परिणाम होतो हा सर्वसाधारण गैरसमज आहे. मात्र बहुतेक सर्वच स्विमिंग पुलांच्या पाण्यात प्रमाणित क्लोरिनचा वापर केलेला असतो. त्यामुळेच पोहण्यासाठी ते अगदी योग्य आणि सुरक्षित असते.

पोहण्याच्या व्यायामाचे फायदे-

गर्भारपणात जर काहीच समस्या आल्या नसतील तर पोहण्याचा व्यायाम जरुर करावा. त्याचा गर्भवती आणि तिच्या होणाऱ्या बाळालाही फायदाच होतो.

रक्ताभिसरण चांगले होते.

गर्भावस्थेत झोप न लागण्याची समस्या असते तेव्हा पोहण्याच्या व्यायामामुळे झोप लागते.

पोहणे हा उत्तम व्यायाम असल्याने कॅलरीज जळतात पण शरीर खूप थकत नाही.

गर्भावस्थेत येणारा थकवा, अशक्तपणा दूर होतो. उर्जा राहते.

हात आणि पाय दोन्हींचे स्नायूंची ताकद वाढते. टोन्ड होतात.

तंदुरुस्ती आणि सहनशक्ती वाढते.

अंगावर सूज येण्याचे प्रमाण कमी होते.

पोहताना सांधे आणि लिगामेंट यांना त्रास होत नसल्याने वेदना होत नाहीत.

हृदय आणि फुफ्फुसे यांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो.

पोहण्याचा व्यायाम सुरु करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे.

पोहण्याचा व्यायाम सावधानता-

गर्भधारणा होण्यापुर्वी जर नियमित पोहण्याचा व्यायाम करत असाल तर फारशी काळजी करण्याची गरज नाही. मात्र नव्यानेच पोहण्याचा व्यायाम शिकणार असाल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत. नव्याने सुरुवात करताना हळुहळु सुरुवात करुन ३० मिनिटांपर्यंत वेळ वाढवावी.

पोहण्यास सुरुवात करण्याआधी थोडा वॉर्म अप जरुर करावे. तसेच पोहणे झाल्यावर शरीर शांत होऊ द्यावे. 

तसेच स्वतःला अति दमवू नका. तीस मिनिटांआधीही दमला आहात असे वाटले तरीही व्यायाम थांबवा.

पोहण्याच्या व्यायामात विविध प्रकारचे स्ट्रोक्स असतात. त्यातील जो आरामात करता येईल अशाच स्ट्रोकची निवड करा. खूप जास्त ताण येणारा स्ट्रोक निवडू नका.

पोहण्याचा व्यायाम करताना वेदना किंवा रक्तस्राव होतो आहे असे वाटल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

पोहण्याचा व्यायाम केल्यानंतर त्याच प्रमाणात आहारही वाढवला पाहिजे. कारण गर्भारपणात वजन कमी करायचे नाही तर योग्य प्रमाणात वाढवायचे आहे.

पोहण्याचा व्यायाम करताना शरीरातील पाणी कमी होता कामा नये त्यामुळे पुरेसे पाणीही प्यावे.

लिंबू सरबत किंवा ग्लुकोज पावडर घालून पाणी पिणे हितकारक ठरु शकते. तसेच पोहायला उतरण्याआधी ग्लासभर पाणी पिऊन मगच पाण्यात उतरावे.

गर्भधारणेचे विविध टप्पे  आणि पोहणे-

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत वास नकोसे वाटतात, कोरड्या उलट्याही होतात त्यामुळे कदाचित तलावातील पाण्याने उलटी येण्याची शक्यता असते. त्यामुळे क्लोरिन नसलेले सॉल्टवॉटर असणारा तलाव असल्यास त्याला प्राधान्य द्या. पोहण्याच्या व्यायामाला सुरुवात करण्यापुर्वी वैद्यकीय सल्ला घेताना इंजेक्शनविषयी विचारून घ्या. जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर इंजेक्शन देतात.

गर्भावस्थेच्या पुढच्या टप्प्यात गुरुत्वाकर्षणाचा शरीरावर परिणाम कमी झाल्याने पाण्यावर सहजपणे तरंगता येते.

तर शेवटच्या तिमाहीत पोटाचे आकारमान वाढते तरीही जमेल तसे पोहता येते. मात्र जर वाढत्या वजनामुळे पाय दुखत असतील किंवा स्नायू टणक झाले असतील तर पोहण्याऐवजी पाण्यात चालण्यानेही पायाचे स्नायू मोकळे होतात. असे चालताना हाताने पाणी मागे ढकलावे कारण वाढत्या पोटामुळे चालण्यास त्रास होतो.

त्याशिवाय पाण्यात उतरताना, आजूबाजूला असलेल्या ओलसर भागातून चालताना चांगल्या प्रकारची चप्पल घालावी जेणेकरून पाय घसरणार नाही.

मात्र पोहताना किंवा पाण्यात चालताना थोडेसे अस्वस्थ वाटल्यास व्यायाम थांबवून इतरांच्या मदतीने पाण्याबाहेर या आणि वैद्यकीय मदत जरुर घ्या. शक्यतो एकट्याने न जाता कोणाला तरी बरोबर घेऊन जावे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon